स्वतःला देवाचा अवतार आणि ज्योतिषाचार्य म्हणवून घेणाऱ्या नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टन खरात याच्या पापाचा घडा आता भरला आहे. महिलांचे लैंगिक शोषण, अघोरी प्रथा आणि हजारो कोटींची अवैध संपत्ती गोळा करणाऱ्या खरातच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (SIT) कमान धडाडीच्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या एन्ट्रीमुळे भोंदूबाबाचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.
७ तासांची मॅरेथॉन चौकशी आणि धक्कादायक खुलासे
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासाला सुरुवात केली. शनिवारी (२१ मार्च) त्यांनी अशोक खरात आणि त्याचा सहकारी नीरज जाधव यांची तब्बल ७ तास सखोल चौकशी केली. या दोघांना समोरासमोर बसवून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून खरातच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी खरातच्या फार्म हाऊस आणि निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यात जे काही सापडले, ते पाहून तपास यंत्रणाही अवाक झाल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
५८ आक्षेपार्ह व्हिडिओ: ज्याचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जात असावा असा संशय आहे. शस्त्रसाठा आणि रोकड: एक पिस्तूल, जिवंत काडतुसे, २ लॅपटॉप आणि ८ लाख रुपयांची रोकड. २ हजार कोटींचे साम्राज्य: खरातच्या नावावर सुमारे ५२ सातबारा उतारे सापडले आहेत. नाशिक, अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील या जमिनींची किंमत १५०० ते २००० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अहिल्यानगरची लेक आणि ‘ऑपरेशन परिवर्तन’चा दरारा या हाय-प्रोफाइल प्रकरणाचा तपास करणाऱ्या तेजस्वी सातपुते या मुळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आहेत. एका शिक्षक आणि शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सातपुते यांनी आपल्या कर्तृत्वाने पोलीस दलात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांनी पुणे येथे राबवलेले हेल्मेट अभियान आणि सोलापूरमधील अवैध दारूधंद्यांविरुद्धचे ‘ऑपरेशन परिवर्तन’ आजही चर्चेत आहे.
गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या आणि पीडितांना न्याय देणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वीही त्यांनी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासारख्या संवेदनशील केसेसमध्ये SIT प्रमुख म्हणून यशस्वी काम केले आहे.
तेजस्वी सातपुते केवळ अटक करण्यावर थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला आहे. १. सायबर फॉरेन्सिक: जप्त केलेले व्हिडिओ आणि लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून न्यायालयात भक्कम तांत्रिक पुरावा सादर करता येईल. २. आर्थिक नाकेबंदी: खरातने जमा केलेली अफाट संपत्ती ही फसवणुकीतून आली असल्यास ती जप्त करून सरकारजमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ३. पीडितांचे मनोबल: भोंदूबाबाच्या दहशतीखाली असलेल्या महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी, यासाठी सातपुते यांनी गोपनीयतेचे आश्वासन दिले आहे.
अशोक खरातवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बलात्काराचे गुन्हे तसेच ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १२ अनुभवी अधिकाऱ्यांच्या पथकासह तेजस्वी सातपुते आता या भोंदूबाबाचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
नाशिकमधील या कारवाईमुळे राज्यभरातील भोंदूबाबांचे धाबे दणाणले असून, “अहिल्यानगरची लेक आता गुन्हेगारांसाठी काळ ठरणार,” अशा चर्चांना उधाण आले आहे.