शरदनाना थोरात सह आरोपीना यांना अटक!

 

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील बचत गटातील सी.आर.पी. महिलेच्या मानधनाच्या कारणावरून पंचायत समिती कार्यालयात तालुका अभियान व्यवस्थापकावरच थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवार (दि. 23 मार्च) रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून शासकीय कार्यालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदलाल पोपटराव कोकाटे (मुळ रा. पारनेर) हे मागील दोन वर्षांपासून संगमनेर पंचायत समितीत तालुका अभियान व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. महिला बचत गटांचे नियंत्रण, त्यांना बँकमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे अशी जबाबदारी ते सांभाळत आहेत.

शेडगाव येथील एका सी.आर.पी. महिलेविरोधात तक्रार दाखल झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी तिला नोटीस बजावली होती. मात्र, त्या नोटिसीला उत्तर न दिल्याने संबंधित महिलेचे मानधन रोखण्यात आले होते.
याच कारणावरून 23 मार्च रोजी दुपारी संबंधित महिला, तिचे पती व आरोपी शरद नाना थोरात हे पंचायत समिती कार्यालयात आले. त्यांनी कोकाटे यांच्याकडे मानधनाबाबत विचारणा केली असता कोकाटे यांनी नियमांनुसार संपूर्ण बाब समजावून सांगितली. मात्र, यावरून शरद थोरात संतापले आणि त्यांनी कोकाटे यांना चापट मारली.


दरम्यान, उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा वाद शांत केला. मात्र, काही वेळातच शरद थोरात यांनी आपल्या मुलगा, पुतणे व इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर 9 ते 10 जणांच्या टोळक्याने पंचायत समितीत घुसून कोकाटे यांचे केबिन शोधून काढले आणि त्यांच्यावर लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.


“तू शरद नानाला ओळखत नाही का? तुला काय करायचे ते कर,” अशी धमकी देत आरोपींनी हल्ला चढवला. या घटनेदरम्यान कर्मचारी वर्गाने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेनंतर जखमी अवस्थेत कोकाटे यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी शरद नाना थोरात, अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवमत भोकरे व इतर 4 ते 5 अनोळखी व्यक्तींवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाणीचे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका शासकीय कार्यालयातच अधिकाऱ्याला अशी बेदम मारहाण होत असेल, तर कायद्याचा धाक उरला आहे का? या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

 

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *