ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत लोणीत रंगणार ‘सेवापूर्ती गौरव‘
आश्वी । झुंझार न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे विणण्यात मोलाचे योगदान देणारे, उपअभियंता इंजि. संजयकुमार भीमराज गायकवाड ३६ वर्षे आणि ३ महिन्यांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या गौरवशाली वाटचालीचा सन्मान करण्यासाठी रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता लोणी (बु.) येथील सुरभी मंगल कार्यालयात भव्य ‘सेवापूर्ती गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळा निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थितीत होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील भूषविणार आहेत.
शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रेरणादायी प्रवास
मूळचे संगमनेर तालुक्यातील तिगांव येथील रहिवासी असलेल्या संजयकुमार गायकवाड यांचा जीवनप्रवास अत्यंत जिद्दीचा आणि प्रेरणादायी आहे. चिंचोली गुरव येथे प्राथमिक व प्रवरा नगर येथील महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी मुंबईच्या नामांकित गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका (DCE) प्राप्त केली. नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २००९ मध्ये पुणे विद्यापीठातून बी.ई. (Civil) आणि २०१४ मध्ये एम.ई. (Structure) या पदव्या संपादन करून त्यांनी स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.
३६ वर्षांची निष्कलंक सेवा आणि विकासाचा वारसा
३० डिसेंबर १९८९ रोजी पंचायत समिती अकोले येथून कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर संगमनेर पंचायत समितीत १९ वर्षे आणि राहता पंचायत समितीत १४ वर्षे त्यांनी सेवा बजावली. गेल्या ३ वर्षांपासून ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत उपअभियंता म्हणून कार्यरत होते. केवळ रस्ते बांधणीच नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. घरकुल, वैयक्तिक शौचालय, सिंचन विहिरी यांसारख्या योजनांमधून त्यांनी सामान्यांना न्याय दिला. अस्तगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची देखणी इमारत, लोणी व कोल्हार येथील बीओटी तत्त्वावरील शाळा आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स, आदिवासी वसाहतींमधील विकासकामे आणि राहता पंचायत समितीची भव्य प्रशासकीय इमारत ही त्यांच्या अभियंत्रिकी कौशल्याची जिवंत स्मारके आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन २०११ मध्ये त्यांना ‘आदर्श अभियंता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सुसंस्कृत आणि उच्चविद्याविभूषित कुटुंब
संजयकुमार गायकवाड यांना समाजसेवेचा वारसा त्यांचे वडील आदर्श शिक्षक भीमराज सयाजी गायकवाड (गुरुजी) आणि आईकडून मिळाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित असून पाचही बहिणी शासकीय सेवेत वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत. त्यांची कन्या डॉ. स्विटी गायकवाड (जे.जे. हॉस्पिटल, मुंबई) आणि चिरंजीव डॉ. सुयश गायकवाड (पी.एम.टी. लोणी) हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून गायकवाड कुटुंब हे ‘डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स’चे कुटुंब म्हणून ओळखले जाते.
निवृत्तीनंतरही समाजसेवेचा ध्यास
आपल्या भावना व्यक्त करताना इंजि. गायकवाड म्हणाले की, “शासकीय सेवेतून निवृत्त होत असलो तरी सामाजिक ऋणातून मुक्त झालेलो नाही. पुढील काळात एनजीओच्या माध्यमातून गरजूंची सेवा करणे आणि माझ्या तांत्रिक अनुभवाचा फायदा वास्तुशास्त्राच्या माध्यमातून सामान्यांना करून देणे हाच माझा संकल्प आहे.”
या सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, आमदार सत्यजीत तांबे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे , महानंदा राज्य दूध संघाचे चेअरमन श्री. राजेश परजणे पाटील , रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री. विजयराव वाकचौरे , प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. अनिलकुमार चव्हाण , राहाता प.स. माजी सभापती श्रीनिवास त्रिभूवन , राहाता प. स .माजी उपसभापती बाबासाहेब म्हस्के पाटील , संगमनेर प.स. माजी सभापती बाळासाहेब गायकवाड , रिपाई राज्य सचिव दिपकराव गायकवाड , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, रिपाई जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू बनसोडे , श्री. चंद्रकांत सरोदे , डॉ भास्करराव नणनवरे , ॲड बबनराव नाईकवाडी , रिपाई ( गवई ) जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम, श्री माणिकराव यादव , श्री रमेश शिरकांडे , श्री. संतोष ब्राम्हणे , श्री. शांताराम संगारे , संगमनेर रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , अकोले रिपाई तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , संगमनेर रिपाई शहराध्यक्ष कैलास कासार , बाभळेश्वर उपसंरपच पप्पू बनसोडे
यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने इंजि. संजयकुमार गायकवाड यांच्या कार्याचा गौरव होत असतानाच, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.