प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; रिपब्लिकन पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या २०२१ ते २०२५ या काळातील मनमानी कारभारावर आणि विविध विकासकामांत झालेल्या कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवत, माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने सागर (अमोल) सुदाम थोरात यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून, या प्रकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाने दिला आहे.

आंबीखालसा गावठाण परिसरात सागर थोरात हे लोकशाही मार्गाने उपोषणास बसले आहेत. त्यांच्या आरोपानुसार, ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या पाच वर्षांत झालेल्या अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विशेष म्हणजे, अनेक कामांसाठी निधी खर्च झाल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्ष जमिनीवर ती कामे झालेलीच नाहीत. याबाबत वेळोवेळी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी माहितीच्या अधिकारात विचारलेली माहितीही नाकारण्यात आल्याने थोरात यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

सागर थोरात यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सुमारे २३ कामांची यादी दिली असून, त्यात खालील प्रमुख कामांचा समावेश आहे:

१. जल जीवन मिशन: कामाची अपूर्ण अवस्था.
२. रस्ते व मुरमीकरण: तांगडी ते रहाटीचादरा रस्ता कागदावरच, प्रत्यक्षात काम नाही.
३. पेव्हर ब्लॉक व गटार बांधकाम: माळदवाडी व प्रभाकरनगर येथील कामात भ्रष्टाचार आणि अपूर्ण कामे.
४. स्मशानभूमी सुशोभीकरण: निधी खर्च होऊनही कामाचा दर्जा निकृष्ट.
५. मागासवर्गीय व अपंग निधी: गेल्या ५ वर्षांत मागासवर्गीयांसाठीचा राखीव निधी आणि अपंगांसाठीचा ५% निधी वापरलाच गेला नाही.
६. इतर: जलशुद्धीकरण प्रकल्प, हायवेचे मोबदले, आणि शाळा/बालवाडीच्या कामांतही अनियमिततेचा आरोप केला आहे.

उपोषणकर्ते सागर थोरात यांना रक्तदाब (BP) आणि मधुमेहाचा (Sugar) त्रास आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. “माझ्या जीविताचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास संबंधित प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील,” असा इशारा त्यांनी आपल्या पत्राद्वारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा प्रशासनाला दिला आहे.


रिपब्लिकन पक्ष व एकलव्य आदिवाशी संघटनेचा पाठिंबा

रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन थोरात यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका तरुणावर उपोषणाची वेळ आली आहे. त्याला तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा रिपब्लिकन पक्ष व एकलव्य संघटना प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असे शेळके यांनी यावेळी ठणकावून सांगितले. तर तहसिलदारांशी दूरध्वनीवरुन संपर्क झाला असता याबाबत मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले .

 

 

 

यावेळी एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , रिपब्लिकन पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष विजय खरात , सिध्दार्थ खरात कार्यकर्ते  व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *