प्रवाशांची कंबर खिळखिळी; काम रखडल्याने संताप, आंदोलनाचा इशारा

 

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

 

शिर्डी ते पुणे या नवीन राज्यमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असले तरी, काही ठराविक टप्प्यांवरील रेंगाळलेल्या कामामुळे प्रवाशांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः शिबलापूर ते पानोडी घाट पायथा या ५ किलोमीटर अंतराचा पूर्वीचा चांगला रस्ता खोदून ठेवल्याने या परिसरात आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता खोदून वर्ष उलटत आले तरी काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांनी आता तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

 

शिर्डी ते पुणे या नवीन राज्यमार्गाचे काम केलवड, लोहारे, निमगांव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, शिबलापूर आणि पानोडी या गावांमधून जात आहे. सध्या राहाता ते पानोडी घाट पायथा या ३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी खर्चून काम सुरू आहे. मात्र, हे काम करत असताना कंत्राटदार आणि संबंधित विभागाकडून प्रवाशांच्या सोयीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिबलापूर ते पानोडी घाट पायथा या दरम्यान असलेला ५ किलोमीटरचा रस्ता सहा महिन्यांपूर्वी सुस्थितीत होता. मात्र, नवीन रस्ता करण्याच्या नावाखाली हा डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून टाकण्यात आला. आज अनेक महिने उलटूनही या ठिकाणी ना खडीकरण झाले, ना डांबरीकरण. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

 

या मार्गावरून प्रवास करताना उडणाऱ्या धुळीच्या लोटांगणामुळे प्रवाशांना आणि रस्त्याशेजारी राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. खड्ड्यांच्या ‘थयथयाटा’मुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांचे मनके आणि कंबर खिळखिळी झाली आहे. अनेक प्रवाशांनी “गाड्यांचे सोडा, आमची हाडे तरी शाबूत राहतील का?” असा संतप्त सवाल विचारला आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे.

 

प्रशासनाच्या धिम्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “हा रस्ता कधी पूर्ण होणार?” असा प्रश्न लोक विचारत आहेत. हा रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहतुकीसाठी योग्य न केल्यास लवकरच तीव्र आंदोलन आणि ‘रस्ता रोको’ करण्यात येईल, असा इशारा संतप्त प्रवासी आणि परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *