संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे ३ हजार १७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, यामुळे ४ हजार ५९१ शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रामुख्याने गहू, कांदा, मका आणि डाळिंब या पिकांना या निसर्गाच्या कोपाचा मोठा फटका बसला असल्याची प्राथमिक माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी दिली आहे.


दोन दिवसात पावसाचे तांडव

रविवारी (दि. २९) आणि सोमवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमारास तालुक्यात अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणच्या घरांचे आणि गोठ्यांचे पत्रे उडून गेले. शेतात काढणीला आलेला गहू आणि कांदा पावसामुळे मातीमोल झाला आहे, तर फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


नुकसानीचा प्राथमिक आकडा

कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार, दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे चित्र भयावह आहे:
रविवारचे नुकसान: अंदाजे १००६.५० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, २४८५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला.

 

सोमवारचे नुकसान: पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी पुन्हा २१७०.९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, ज्यात २१०६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
एकूण: दोन दिवसात एकूण ३१७७.४६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ४५९१ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

तालुक्यातील धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक, निमगाव भोजापूर, मंगळापूर, निमज, पेमगिरी, निमगाव खुर्द, निमगाव बुद्रुक, वडगाव लांडगा, राजापूर, चिखली, चिकणी आणि सायखिंडी या गावांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला. या भागातील मका, गहू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. डाळिंबाच्या बागांनाही या पावसाने झोडपून काढले आहे.

काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील पठार भागात गारपिटीने नुकसान झाले होते, त्यातून शेतकरी सावरत असतानाच आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाने आपला प्राथमिक अहवाल महसूल विभागाला सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

“संगमनेर तालुक्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचे प्राथमिक पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये मका, गहू, कांदा, भाजीपाला आणि डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण ३१७७.४६ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा आमचा प्राथमिक अंदाज असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या ४५९१ आहे. हा अहवाल लवकरच वरिष्ठ पातळीवर सादर केला जाईल.”

 

– रेजा बोडके (तालुका कृषी अधिकारी, संगमनेर)

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *