पालकांच्या पैशांची बचत करत दिला पर्यावरणाचा अनोखा संदेश
संगमनेर । झुंझार न्यूज
जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून ‘काहीतरी देणे लागते या पृथ्वीचे’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत, पानोडी येथील बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या चिमुकल्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर उरलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांपासून या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने स्कूल डायरी आणि नोटबुक तयार करत ‘टाकाऊतून टिकाऊ’चा संदेश दिला आहे.
दरवर्षी परीक्षा संपली की विद्यार्थी जुन्या वह्या रद्दीत विकून टाकतात. मात्र, बालपण स्कूलच्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी या वह्या रद्दीत न देता, त्यातील शिल्लक राहिलेली कोरी पाने आणि एका बाजूने कोरी असलेली पाने एकत्र केली. या पानांपासून त्यांनी पुढील संपूर्ण वर्षभरासाठी शाळेच्या नोंदी ठेवण्यासाठी आकर्षक ‘स्कूल डायरी’ आणि गृहपाठासाठी ‘नोटबुक’ तयार केल्या आहेत.
केवळ वह्या शिवून मुले थांबली नाहीत, तर त्यांनी टाकाऊ पुठ्ठे आणि रंगीत कागदांचा वापर करून या डायऱ्यांना अतिशय सुंदररीत्या सजवले आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये श्रमाची आवड निर्माण झाली असून, महागड्या वह्या विकत न घेता स्वतःच्या हाताने वही तयार केल्याने पालकांच्या पैशांचीही मोठी बचत झाली आहे.
कागद बनवण्यासाठी झाडांची कत्तल केली जाते. कागदाचा पुनर्वापर म्हणजे पर्यायाने झाडे वाचवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे होय. बालपण स्कूलचे विद्यार्थी वर्षभर पर्यावरणाशी संबंधित विविध उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून पृथ्वी दिनानिमित्त राबविलेल्या या ‘रिसायकल’ उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा अनोखा उपक्रम शाळेच्या प्रमुख सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करत विशेष परिश्रम घेतले.

या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवला असून, ‘टाकाऊ’ समजल्या जाणाऱ्या वस्तूंतूनही ‘टिकाऊ’ आणि उपयुक्त गोष्टी कशा घडवता येतात, याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.

