आश्वी । झुंझार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा मार्गावर चक्क ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करून रस्ता उखडून टाकला आहे. या कृत्यामुळे केवळ रस्त्याचेच नुकसान झाले नाही, तर जवळच असलेल्या प्रवरा डाव्या कालव्याच्या भरावाचेही नुकसान झाल्याने सिंचन व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभाग, राहाता अंतर्गत ‘संगमनेर-जोर्वे-उंबरी बाळापूर-दाढ बुद्रुक-कोल्हार’ या जिल्हा मुख्य मार्ग क्र. २१ चे काम सुरू आहे. ७ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उपविभागीय अभियंता श्री. गुंजाळ यांनी मुकादम बबन बाबूराव ओव्हळ यांना फोनवरून माहिती दिली की, उंबरी बाळापूर येथे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर नांगर फिरवून काम खराब केले आहे.
माहिती मिळताच बबन ओव्हळ यांनी सहकारी मयूर गायकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तिथे प्रवरा डावा कालव्याजवळील पुलापाशी पाहिले असता, रस्त्याची नांगरणी केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यावेळी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता सिद्धांत शिंदे हेदेखील तेथे उपस्थित होते.


रस्ता कुणी नांगरला याबाबत ओव्हळ यांनी परिसरातील ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, लक्ष्मण शंकरराव भुसाळ आणि नानासाहेब सुखदेव उंबरकर यांनी सांगितले की, महेश ऊर्फ छोट्या अनिल सरोदे (रा. उंबरी बाळापूर) याने त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या विना नंबरच्या ‘स्वराज ७४४ एक्स टी’ ट्रॅक्टरने ही नांगरणी केली आहे.

 

महेश सरोदे याने केवळ रस्ताच नांगरला नाही, तर प्रवरा डाव्या कालव्याच्या कडेला असलेला मातीचा भरावदेखील नांगरून काढला. यामुळे कालव्याच्या स्थैर्याला धोका निर्माण झाला असून, पाणी सोडल्यानंतर कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारी कामात अडथळा आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.


याप्रकरणी मुकादम बबन ओव्हळ यांनी आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी महेश ऊर्फ छोट्या अनिल सरोदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (५), २८५ आणि महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ चे कलम ९३ (१) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे करत आहेत.


सरकारी रस्ता नांगरल्याच्या या अजब घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, तरुणाने हे टोकाचे पाऊल कोणत्या रागातून किंवा कारणातून उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed