आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे वाळू माफियांच्या मुजोरीचा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदीपात्रातून वाळू उपसा सुलभ व्हावा, यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी चक्क आदिवासी आणि दलित समाजाच्या दफनभूमीतूनच बेकायदेशीर उत्खनन करून रस्ता तयार केला आहे. या प्रकारामुळे आपल्या पूर्वजांच्या स्मृतींचा अवमान झाल्याची भावना निर्माण झाली असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

चणेगाव येथील गट नंबर १ मध्ये आदिवासी आणि दलित समाजाची दफनभूमी आहे. या ठिकाणी दोन्ही समाजातील बांधवांनी वर्षानुवर्षांपासून आपल्या पूर्वजांचे आणि नातेवाईकांचे मृतदेह दफन केले आहेत. ही जागा समाजासाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा विषय आहे. मात्र, नदीपात्रातून वाळू चोरून नेण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी या दफनभूमीवर जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन केले. दफन केलेल्या मृत व्यक्तींच्या जागेचा कोणताही मुलाहिजा न ठेवता तिथून वाळू वाहतुकीसाठी रस्ता बनवण्यात आला. या कृत्यामुळे मृतदेहांच्या अवशेषांची विटंबना होण्याची शक्यता निर्माण झाली असून, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप स्थानिक आदिवासी बांधवांनी केला आहे.

या अमानवी प्रकाराची माहिती मिळताच चणेगावमधील संतप्त नागरिकांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेतली. संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण मुंढे, तहसीलदार धीरज मांजरे आणि आश्वीचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांनी केवळ जमिनीचे नुकसान केले नाही, तर समाजाच्या अस्मितेवर घाला घातला आहे. या प्रकरणातील दोषींवर दफनभूमीचा अपमान केल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी आणि या कृत्याबद्दल ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.


गावात सध्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण असून, प्रशासनाने आदिवासी आणि दलित समाजाच्या भावनांचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे. गावपातळीवर सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत आणि संबंधितांना तात्काळ अटक करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या निवेदनाच्या प्रती अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिबलापूरचे मंडळ अधिकारी, आश्वीचे पोलीस निरीक्षक, चणेगावचे महसूल अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच यांना पाठवण्यात आल्या आहेत. केवळ निवेदनावर न थांबता, आदिवासी बांधवांचे एक शिष्टमंडळ राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असून, त्यांना या घटनेची सविस्तर माहिती देऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

आता या प्रकरणात महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि वाळू माफियांच्या या कृत्यावर किती कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *