आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेत राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांना कडक निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर आश्वी पोलिसांनी रविवारी रात्री आश्वी खुर्द आणि आश्वी बुद्रुक परिसरात जोरदार नाकाबंदी करत संशयितांची कसून चौकशी केली.
शनिवारी सायंकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वी खुर्द व आश्वी बुद्रुक या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. नागरिकांनी या भागात होत असलेल्या चोऱ्यांच्या सत्राबाबत तक्रारींचा पाढा पालकमंत्र्यांसमोर वाचला. चोरांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून पोलिसांचा दरारा कमी झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होत होता. यावर पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत आश्वी पोलिसांना गुन्हेगारांचा कडक बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. “नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दात त्यांनी पोलिसांना तंबी दिली होती.
पालकमंत्र्यांच्या कडक निर्देशानंतर आश्वी पोलीस यंत्रणा रविवारी रात्रीपासूनच अॅक्शन मोडमध्ये दिसून आली. आश्वी खुर्द आणि आश्वी बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर आणि संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी चोख नाकाबंदी लावली होती. रात्रीच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. ज्या वाहनधारकांकडे कागदपत्रे नव्हती किंवा ज्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, अशा अनेक संशयित गाड्या पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावल्या आहेत.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून चोऱ्यांच्या सत्राला लगाम बसेल, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. “पोलिसांनी जर अशाच प्रकारे सातत्याने गस्त आणि नाकाबंदी केली, तर खरोखर चोरांचा बंदोबस्त होईल,” अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. .

आश्वी पोलिसांनी आता गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात या कारवाईचे स्वागत होत आहे

