संगमनेर | झुंझार न्यूज 

शेतकरी आणि ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथे कृषीदूतांचे आगमन झाले आहे. मालदाड येथील ‘श्रमशक्ती कृषि महाविद्यालया’च्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत गावात पाऊल ठेवले असून, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या श्रमशक्ती कृषि महाविद्यालयाच्या वतीने ‘कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नक’ (RAWE & AIA) हा कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शेतीमधील प्रत्यक्ष समस्या, शेतकऱ्यांचे अनुभव आणि ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देणे हा आहे. हे कृषीदूत पुढील काही काळ सायखिंडी गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. साहेबराव नवले पाटील यांच्या प्रेरणेने आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रम समन्वयक प्रा. निलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. डी. तायडे आणि महाविद्यालयातील विविध विषयांच्या तज्ज्ञांच्या सूचनेनुसार विद्यार्थी आपले कार्य करणार आहेत.

कृषीदूत अथर्व भालेराव, ज्ञानेश्वर सावंत, दिग्विजय पवार, समर्थ निकम, सोहम रोकडे आणि ओंकार हांडे हे विद्यार्थी सायखिंडी गावातील शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि प्रसार.
पेरणीपूर्वीची बीज प्रक्रिया.
गांडूळ खत निर्मिती व खत व्यवस्थापन.
चारा पिकांचे नियोजन आणि फळबाग व्यवस्थापन.
दुग्ध व्यवसाय आणि पूरक उद्योग.
आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक व तुषार सिंचन).
बायोगॅस यांसारख्या विषयांवर प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे.


कृषीदूतांच्या आगमनाप्रसंगी सायखिंडी गावच्या सरपंच सौ. नीलमताई पारधी, उपसरपंच श्री. दिपक करंजकर यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील प्रगतशील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावातील तरुण शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची जोड मिळण्यास मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *