{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

मॉडेल स्कूलमध्ये पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात संपन्न

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात 11 ते 16 वयोगटातील 100 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले.


या उपक्रमातून विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक मा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल येथे जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की देश विकसित करायचा असेल तर युवकांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असून समाजातील आर्थिक विषमता कमी झाली तरच देश खऱ्या अर्थाने प्रगत होईल, असे त्यांनी नमूद केले.

शिबिरात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात योगा, एरोबिक्स आणि व्यायामाचे प्रकार घेण्यात आले, तर सायंकाळी मैदानी खेळ, पथनाट्य, नाटक, अभिनय, नृत्य, गीतगायन आणि झांज अशा सांस्कृतिक उपक्रमांनी विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव दिला.


बौद्धिक सत्रात प्रा. बाबा खरात यांनी पर्यावरणाचे महत्त्व, शिवाजी नाईकवाडी यांनी मानवी मूल्ये, तर हिरालाल पगडाल यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांवरील समज-गैरसमज यावर मार्गदर्शन केले. स्वप्निल मानव यांनी “आजचा युवक” या विषयावर संवाद साधला. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे प्राचार्य आशिष कुमार यांनी करिअर मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मातीकाम, पेंटिंग, कागदकाम, ओरिगामी आणि हॉर्स रायडिंगसारखे उपक्रम घेण्यात आले. यासाठी प्राचार्य आशिष कुमार आणि शोभा हजारे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनंत शिंदे, बजरंग जेडगुले आणि हर्षल थेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिरात वैभवी प्रेमलता संजय आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव, तेजस पवार यांसह अनेक प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. सहासी खेळ, योगा, छायाचित्रण, रायफल शूटिंग, स्काऊट गाईड, प्रथमोपचार, ट्रेकिंग, संगीत, संस्कार आणि अभिनय यांसारख्या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


समारोपप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी पुढील शिबिराचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. यावेळी डॉ. तांबे यांनी सुट्टीच्या काळात पुन्हा शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या गावात वाचन चळवळ सुरू करावी, त्यासाठी आवश्यक पुस्तके जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.


यावेळी पालक, विद्यार्थी तसेच जयहिंद लोकचळवळीचे राजेंद्र जोरावर  आणि विलास दिघे  उपस्थित होते

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed