शिबलापूर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील माळेवाडी-शिबलापूर परिसरातून एक १७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला असून, त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. मंगल संजय पवार (वय ४०, रा. माळेवाडी, शिबलापूर) या मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा १७ वर्षीय मुलगा सिद्धांत संजय पवार हा १० वी पर्यंत शिकलेला असून तो लहानपणापासूनच काहीसा मंदबुद्धीचा आहे. तो घरीच असायचा आणि नेहमीप्रमाणे घरातील शेळ्या चारण्यासाठी रानात जात असे.

दिनांक १५ मे २०२६ रोजी सायंकाळी सिद्धांतच्या खिशात तंबाखूची पुडी सापडल्याने, त्याचे वडील संजय पवार यांनी त्याला रागावून एक चपराक मारली होती. त्यानंतर तो घरातील इतरांसोबत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी, १६ मे रोजी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेळ्या घेऊन रानात गेला. मात्र, सायंकाळी त्याचे आई-वडील मजुरीवरून घरी परतले असता, सिद्धांत घरी आढळून आला नाही.

सिद्धांत घरी न परतल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी त्याची आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. इतकेच नव्हे तर शिबलापूर शिवारासह अकोले, संगमनेर, घोटी आणि इगतपुरी यांसारख्या विविध ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अखेर, आपल्या मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर आईने आश्वी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अपहरित मुलाचे वर्णन:
नाव: सिद्धांत संजय पवार
वय: १७ वर्षे ४ महिने ११ दिवस (जन्म तारीख: ०७/०१/२००९)
उंची: ५ फूट
रंग: सावळा, बांधा: जाड
पोशाख: अंगात लाल रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुल जीन्स पॅन्ट आणि पायात चप्पल.
याप्रकरणी मंगल पवार यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. अशा वर्णनाचा मुलगा कोठे आढळल्यास तात्काळ आश्वी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

