५ लाख तोफगोळ्यांची वार्षिक निर्मिती क्षमता;
निबे समूहाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सीडीएस अनिल चौहान यांची प्रमुख उपस्थिती.
शिर्डी । झुंझार न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत’ या धोरणाला बळकटी देणारे एक मोठे पाऊल आज अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यात पडत आहे. शिर्डी येथील सावळीविहीर एमआयडीसीमध्ये ‘निबे’ समूहातर्फे उभारण्यात आलेल्या देशातील भव्य खासगी संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन आज, शनिवारी (दि. २३ मे) थाटात संपन्न होणार आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

१००० कोटींची गुंतवणूक आणि ५ लाख उत्पादनाचे लक्ष्य
निबे समूहाने शिर्डी परिसरात सुमारे २०० एकर क्षेत्रावर हे अद्ययावत संकुल उभारले आहे. या प्रकल्पात तब्बल १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या संकुलाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे येथे दरवर्षी ५ लाख तोफगोळ्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे. यासोबतच क्षेपणास्त्र संकुल (Missile Complex) हे भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशाचे संरक्षण दलप्रमुख (CDS) जनरल अनिल चौहान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री अतुल सावे, संरक्षण विभागाचे (DRDO) अध्यक्ष डॉ. समीर कामत आणि निबे समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रोजगार आणि विकासाला चालना
या प्रकल्पाबाबत माहिती देताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, “शिर्डी आता केवळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र न राहता, देशातील एक प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाईल. या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून, आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.”

संरक्षण प्रकल्पाच्या जोडीलाच पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना देण्यासाठी येथे एका ‘बायो-सीएनजी’ गॅस प्रकल्पाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून २३ आणि २४ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथे एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात संरक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती नागरिकांना घेता येईल.
Post Views: 91


