संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, राज्याचे माजी महसूल मंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज तिगाव येथे जाऊन शोकाकुल सानप कुटुंबीयांचे सांत्वन केले. या दुर्दैवी कुटुंबाला प्रशासकीय पातळीवर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शुक्रवारी दुपारी तिगाव येथील एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात महेश गोरखनाथ सानप (वय १८) आणि ओमकार गोरखनाथ सानप (वय १४) हे दोन सख्खे भाऊ पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचाही पाण्यात बुडून अंत झाला. विशेष म्हणजे, अवघ्या एक वर्षापूर्वीच या मुलांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचा आधार बनू पाहणाऱ्या दोन तरुण मुलांचा असा अचानक अंत झाल्याने सानप कुटुंब पोरकं झालं असून गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई दौऱ्यावर असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी तातडीने आपल्या कार्यकर्त्यांना मदतीच्या सूचना दिल्या होत्या. आज मुंबईहून परतल्यानंतर त्यांनी थेट तिगाव गाठले. मयत मुलांच्या मातोश्री मनीषा सानप व इतर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी थोरात भावूक झाले होते. “एकाच वर्षात कुटुंबातील तीन कर्ते पुरुष जाणे ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भेटीदरम्यान थोरात यांनी तातडीने कृषी व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला. “या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांना शासकीय नियमानुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून द्या,” अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच, “पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा धोकादायक ठिकाणी तरुणांनी जाऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी थोरात यांच्यासोबत सरपंच ज्ञानेश्वर सानप, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, डॉ. संदीप गोरडे, अनिल कांदळकर, वाल्मीक सानप, छबुराव सानप, नामदेव सानप, प्रभाकर कांदळकर, प्रकाश सानप, संजय सानप, योगेश सानप, विशाल सानप यांच्यासह गावातील असंख्य नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. थोरात यांनी सानप कुटुंबीयांना धीर देत, “संपूर्ण गाव आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास दिला.
दोन तरुण मुलांच्या जाण्याने तिगाव परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत असून, या कुटुंबाला आधार देण्यासाठी संपूर्ण गाव सरसावले आहे.