आश्वी । झुंझार न्यूज

नाशिक जिल्ह्यातील हर्सूल जवळील कश्यपी धरण परिसरात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील एका दाम्पत्यासह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेत ठोंबरे दाम्पत्याची दोन वर्षांची चिमुरडी एका धाडसी महिलेमुळे थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे पिंपरणे गावावर शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कैलास ठोंबरे (वय ३२), त्यांची पत्नी रोहिणी सचिन ठोंबरे, तसेच त्यांच्या शेजारी राहणारे केतन अनिल पवार (वय १६) आणि कौशल अनिल पवार (वय १४) अशी मृतांची नावे आहेत. विशेष म्हणजे, मृत रोहिणी ठोंबरे या गरोदर होत्या. सचिन ठोंबरे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होते. हे कुटुंब मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे (ठोंबरे वस्ती) येथील असून गेल्या दोन वर्षांपासून नाशिकमधील म्हसरूळ-मखमलाबाद नाका परिसरात वास्तव्यास होते.


रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने हे कुटुंब फिरण्यासाठी कश्यपी धरण परिसरात गेले होते. धरण परिसरात ही पाचही जण असताना अचानक चौघे जण पाण्यात बुडाले. यावेळी ठोंबरे यांची दोन वर्षांची चिमुरडी काठावरच होती. ती रडत “मम्मी-पप्पा” म्हणत वारंवार पाण्याचा दिशेने बोट दाखवत होती. याच वेळी तिथे असलेल्या संगीता घाडगे या महिलेचे लक्ष त्या बालिकेकडे गेले.


संगीता घाडगे यांनी प्रसंगवधान राखून तातडीने बालिकेच्या दिशेने धाव घेतली आणि तिला उचलून सुरक्षित ठिकाणी आणले. बालिकेच्या रडण्यामुळे आणि जवळच पडलेला चपलांचा जोडा पाहून घाडगे यांना कोणीतरी पाण्यात बुडाल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना माहिती दिली.


घटनेची माहिती मिळताच परिसरात सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेतील नागरिक आणि स्थानिक तरुणांनी धरणाकडे धाव घेतली. काही धाडसी तरुणांनी तातडीने खोल पाण्यात उड्या मारून शोधकार्य सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर चौघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. एकाच वेळी चौघांचे मृतदेह बाहेर निघाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोंबरे कुटुंब त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पवार भावंडांना सोबत घेऊन फिरण्यासाठी आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


दोन वर्षांच्या चिमुरडीच्या डोळ्यादेखत तिचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्याने पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले होते. सध्या ही चिमुरडी सुरक्षित असली तरी तिच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *