पुणे । झुंझार न्यूज
गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला आणि २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे देणारा ‘एम एस-सीआयटी’ (MS-CIT) हा कोर्स आता एका नव्या रूपात विद्यार्थ्यांच्या भेटीला आला आहे. वाढत्या तंत्रज्ञानाचा विचार करून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (MKCL) आता ‘एम एस-सीआयटी – एआय पॉवर्ड’ हा अद्ययावत कोर्स सुरू केला आहे. या माध्यमातून आता विद्यार्थी केवळ संगणकच नव्हे, तर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) चालवण्यासही सक्षम होणार आहेत.

डिजिटल डिव्हाईडनंतर आता ‘एआय डिव्हाईड’चे आव्हान
गेल्या २० वर्षांत एमकेसीएलने शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत ‘डिजिटल डिव्हाईड’ (डिजिटल तफावत) कमी करण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र, आताच्या काळात ‘एआय’ जाणणारे आणि न जाणणारे अशी नवी दरी निर्माण होत आहे. एआयमुळे नोकऱ्या जातील का? अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, एआय हे भीतीचे कारण नसून ते प्रगतीचे साधन ठरावे, या उद्देशाने या कोर्सची पुनर्रचना करण्यात आली असल्याची माहिती विभागीय समन्वय (पुणे) विश्वजीत उत्तरवार यांनी दिली.

१२५ हून अधिक एआय टूल्सचा समावेश
नवीन एम एस-सीआयटी कोर्समध्ये केवळ विंडोज किंवा एम एस ऑफिसपुरते मर्यादित ज्ञान न देता, १२५ पेक्षा जास्त उपयुक्त एआय टूल्सची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये चॅट जीपीटी (ChatGPT), गुगल जेमिनी (Google Gemini), मायक्रोसॉफ्ट कोपायलट (Microsoft Copilot) आणि ग्रोक एआय (Grok AI) यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर करून दैनंदिन कामे कशी सोपी करावीत, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय २५० पेक्षा अधिक स्किल्स या कोर्सचा भाग आहेत.

कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये
१. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI): सर्जनशील कामे करणे, अभ्यासात मदत घेणे आणि कामाचा वेग वाढवण्यासाठी एआय टूल्सचा प्रभावी वापर.
२. सायबर सुरक्षा: ऑनलाईन फसवणूक, फिशिंग आणि सोशल मीडिया सुरक्षिततेचे सखोल धडे.
३. डेटा साक्षरता: माहितीचा योग्य वापर करून अचूक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
४. डिजिटल कौशल्ये: स्मार्टफोन, लॅपटॉप, डिजिटल व्यवहार (UPI), डिजीलॉकर आणि झूम यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचे प्रगत प्रशिक्षण.
५. एआय इन ऑफिस: एम एस ऑफिसमध्ये (Word, Excel, PPT) एआयचा वापर कसा करावा, याचे खास मार्गदर्शन.

१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
सध्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअरच्या दृष्टीने विचार करण्यासाठी मोकळा वेळ आहे. या काळात विद्यार्थ्यांनी पारंपरिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन ‘एआय पॉवर्ड’ कोर्सची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कोर्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर गृहिणी, शिक्षक, व्यावसायिक आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्रातील ५००० केंद्रांवर प्रवेश सुरू
संपूर्ण महाराष्ट्रात एमकेसीएलचे ५००० हून अधिक अधिकृत प्रशिक्षण केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर सुसज्ज कॉम्प्युटर लॅब आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत या नवीन कोर्सचे प्रवेश सुरू झाले आहेत. आपल्या भविष्यातील करिअरला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नजीकच्या एम एस-सीआयटी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन एमकेसीएल पुणे विभागातर्फे करण्यात आले आहे.
