अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 

 

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असताना, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे पाटील यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला आहे. येत्या ३० मे रोजी एका भव्य सोहळ्यात ते कमळ हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.


राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, विधान परिषदेचे सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. राम शिंदे यांनी एक सूचक विधान केले होते. “भाजपचा उमेदवार पक्षातील जुना कार्यकर्ता असेल किंवा एखादा अचानक आलेला पाहुणा सुद्धा असू शकतो,” असे संकेत शिंदे यांनी दिले होते. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्तामुळे आता तो ‘पाहुणा’ दुसरा तिसरा कोणी नसून तनपुरेच असतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामागे मोठी राजकीय गणिते असल्याचे बोलले जात आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तनपुरे यांनी घेतलेली सावध भूमिका आणि काही तांत्रिक कारणास्तव झालेली राजकीय जुळवाजुळव चर्चेत राहिली होती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या माघारीचे किंवा दाखवलेल्या समंजसपणाचे ‘बक्षीस’ म्हणून भाजप त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी देऊन थेट सभागृहात पाठवणार का? या चर्चेला उधाण आले आहे.

प्राजक्त तनपुरे हे नगर जिल्ह्यातील तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याने पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे, भाजपमध्ये विखे पाटील आणि आता तनपुरे पाटील हे दोन प्रबळ गट एकत्र आल्यास जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश मुंबईत होणार की नगरमध्ये, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, ३० मे ही तारीख निश्चित झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या प्रवेशामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार असून, विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.

आता ३० मे रोजी होणाऱ्या अधिकृत सोहळ्यानंतरच या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब होईल आणि तनपुरे यांची नवी राजकीय खेळी स्पष्ट होईल .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *