तातडीने मनुष्यबळ पुरवण्याची प्रवीण कानवडे यांची पालकमंत्री ना. विखे पाटलांकडे मागणी

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील घारगाव, तळेगाव आणि धांदरफळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन गृहांच्या इमारती तयार असूनही केवळ मनुष्यबळाअभावी त्या गेली अनेक वर्षे धूळखात पडल्या आहेत. यामुळे दुःखद प्रसंगी ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, येथे तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संगमनेर शहराध्यक्ष प्रवीण अरुण कानवडे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण कानवडे यांनी नुकतीच मुंबई येथे नुकतीच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या समस्या विषयी निवेदन दिले असून या निवेदनात नमूद केले आहे की, संगमनेर तालुक्याचा विस्तार खूप मोठा आहे. तालुक्यात एकूण १० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत, मात्र हक्काची ग्रामीण रुग्णालये केवळ साकूर आणि घुलेवाडी याच दोन ठिकाणी उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण तालुक्यातील वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू पावलेल्या दुर्दैवी लोकांच्या शवविच्छेदनासाठी (पोस्ट- मोर्टम) केवळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील मृतदेह येथेच आणले जात असल्याने घुलेवाडी येथील शवविच्छेदन गृहावर आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. नागरिकांची सोय व्हावी म्हणून तालुक्यातील तळेगाव, धांदरफळ खुर्द, जवळे कडलग, घारगाव, बोटा, निमगाव जाळी, आश्वी खुर्द, पोखरी बाळेश्वर, चंदनापुरी व निमोन या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून शवविच्छेदन गृहे बांधण्यात आली आहेत. मात्र, केवळ आवश्यक मनुष्यबळ (डॉक्टर्स व तंत्रज्ञ/कर्मचारी) मंजूर किंवा उपलब्ध नसल्याने ही गृहे गेल्या अनेक वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत आहेत. साकूर, बोटा, घारगाव यांसारख्या दुर्गम आणि आदिवासी वाडी-वस्तीवरील गरीब नागरिकांना आपल्या नातेवाइकाचा मृतदेह घेऊन वेळी-अवेळी ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या घुलेवाडी रुग्णालयात यावे लागते. अनेकदा वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि आर्थिक चणचण यामुळे या कुटुंबांचे अतोनात हाल होतात. दुःखाच्या डोंगराखाली दबलेल्या या नागरिकांना प्रशासकीय अनास्थेमुळे आणखी यातना सहन कराव्या लागतात, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

ग्रामीण भागातील जनतेची ही मोठी गैरसोय दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आपल्या स्तरावरून तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कानवडे यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या घारगाव, धांदरफळ खुर्द व तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ युद्धपातळीवर उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही विनंती त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

पालकमंत्री ना. विखे यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या सूचना

 

संगमनेर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्वरित याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करण्यासाठी मनुष्यबळ देण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *