अहिल्यानगर जिल्हा ‘डिफेन्स हब’ म्हणून विकसित होतोय; केंद्र व राज्य सरकारचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश

 

शिर्डी । झुंझार न्यूज

 


अंमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभर धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात कडक धोरण अवलंबले असून, या मोहिमेत भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) हिरिरीने पुढाकार घ्यावा. ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या माध्यमातून राज्य नशामुक्त करण्याचा संदेश प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवावा,” असे आवाहन महसूल, दुग्धव्यवसाय विकास व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘युवा शक्ती जागर’ यात्रेचे शुक्रवारी शिर्डीत मोठ्या उत्साहात आगमन झाले. या निमित्ताने आयोजित युवा मोर्चाच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सरचिटणीस अशोक पवार, भाजयुमो उत्तर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर यांसह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अंमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करणे ही काळाची गरज


मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, “केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी ज्याप्रमाणे देश नक्षलमुक्त करून दाखवला, त्याच धर्तीवर आता अंमली पदार्थमुक्त देशासाठी त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अंमली पदार्थांचे रॅकेट देशाच्या सामाजिक व्यवस्थेला पोखरत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणा पुरेशी नसून, जनसहभागाची आणि विशेषतः युवकांच्या प्रबोधनाची गरज आहे. भाजयुमोने यासाठी गावोगावी जाऊन तरुणांमध्ये जागृती करावी.”

युवा शक्ती हेच भारताचे बलस्थान


देशाच्या परिवर्तनात युवकांच्या भूमिकेवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “आज भारत जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. ही बौद्धिक आणि ऊर्जासंपन्न शक्ती देशाला महासत्ता बनवण्याकडे वाटचाल करत आहे. गेल्या १२ वर्षांत स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी मिळाल्या आहेत.”

अहिल्यानगर जिल्हा बनतोय ‘डिफेन्स हब


राज्यातील वाढत्या गुंतवणुकीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, “आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येत आहे. अहिल्यानगर जिल्हा आता ‘डिफेन्स’ (संरक्षण) क्षेत्रातील उत्पादनांचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित होत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून उभे राहणारे हे प्रकल्प जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराची नवीन कवाडे उघडतील.”

चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर द्या


भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “केंद्र व राज्य सरकारचे जनहितैषी निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी युवा मोर्चावर आहे. अनेकदा काही शक्ती युवकांमध्ये चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र अशा प्रवृत्तींना कोणताही जनाधार नसतो. सरकारने केलेले काम प्रभावीपणे मांडल्यास अशा प्रवृत्ती आपोआप मोडीत निघतील.”

 

सांस्कृतिक वारसा जपण्याचा यात्रेचा उद्देश: कृष्णकांत महाडीक
भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांनी यात्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “तरुणांना केवळ राजकीय प्रवाहातच नाही, तर राष्ट्रीय विचारांच्या आणि राज्याच्या गौरवशाली सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकारच्या विकास योजनांची माहिती तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणे हेच या ‘युवा शक्ती जागर’ यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांनी केले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, ज्यामुळे शिर्डी परिसर ‘भारतीय जनता पार्टी’ आणि ‘युवा शक्ती’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.