आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाला १५ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तपासाला गती देऊन आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

१ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी संदीप घुगे यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने गोळीबार केला होता. हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या मात्र, प्रसंगावधान राखून घराचा दरवाजा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेमुळे घुगे कुटुंबिय आणि संपूर्ण मालुंजे परिसर दहशतीखाली वावरत आहे.


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पंधरा दिवस उलटूनही पोलीस रिकाम्या हातानेच आहेत. आरोपींचा कोणताही सुगावा न लागल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संतापलेल्या ग्रामस्थांनी यापूर्वी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलनही केले होते.


या प्रकरणाची दखल घेत आमदार अमोल खताळ पाटील यांनी नुकतीच संदीप घुगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी घुगे कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत आपली तीव्र नाराजी आमदारांसमोर व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करावी आणि राजकीय दबावाला बळी पडू नये, अशी भावना ग्रामस्थांनी मांडली.

आमदारांची आश्वासक भूमिका

ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर आमदार अमोल खताळ पाटील यांनी पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून तपासाचा आढावा घेणार असल्याचे सांगितले. “अशा गंभीर घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करेन,” अशी ग्वाही आमदार खताळ पाटील यांनी यावेळी दिली

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *