झरेकाठी । झुंझार न्यूज 

 


महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांचे विचार आणि शिकवण जपण्याचे महान कार्य वारीच्या माध्यमातून सातत्याने होत असते. या परंपरेतूनच एक सक्षम पिढी उभी राहत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. विखे पाटील परिवाराचे वारकरी संप्रदायाशी पिढ्यानपिढ्यांचे नाते असून, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेली ही सेवा परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेली जात आहे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

शिर्डी मतदारसंघातील चिंचपूर येथे श्री संत सुरदास महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान प्रसंगी त्या बोलत होत्या. आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलचरणी प्रार्थना करताना त्यांनी “पांडुरंगा, यंदा चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे आणि सर्वांवरील संकटे दूर कर,” असे साकडे घातले.

प्रशासकीय तयारी आणि ‘चरणसेवा’ उपक्रमाचे कौतुक


अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालख्या आणि दिंड्यांसाठी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. यावर्षी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचे सौ. विखे पाटील यांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध वैद्यकीय तज्ज्ञांची पथके वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असून, त्यांच्या पायांची सेवा करत आहेत. या कार्याबद्दल त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे व प्रशासनाचे अभिनंदन केले.

विखे पाटील परिवाराची वारकरी सेवा


सौ. विखे पाटील पुढे म्हणाल्या की, “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमीच वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुढाकार घेतला आहे. अनेक धार्मिक स्थळी वारकऱ्यांसाठी आश्रमांची स्थापना करून त्यांना निवास आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजही ना. राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि संपूर्ण परिवार वारकऱ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.”

 


चिंचपूर येथील या सोहळ्याला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलासराव तांबे, प्रवरा बँकेचे संचालक गीताराम तांबे, दिंडी चालक शिवाजी महाराज गिरी, ह.भ.प. नामदेव महाराज तांबे, ह.भ.प. मगनानंदगिरी महाराज, लक्ष्मण तांबे यांच्यासह परिसरातील भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तीमय वातावरणात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत सुरदास महाराज यांची दिंडी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ झाली.

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *