आश्वी । झुंझार न्यूज

साकूर पठार भागात अवैध गौण खनिज तस्करीने कळस गाठला असून, आता वाळू तस्करांनी थेट वनविभागाच्या हद्दीवरच अतिक्रमण करण्याची मजल मारली आहे. मुळा नदीचा पूर ओसरताच वाळू उपसा करण्यासाठी तस्करांनी जांबुत गावच्या स्मशानभूमीतून थेट वनविभागाच्या क्षेत्रातून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तयार केला आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुळा नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्रातील वाळू उपसा पूर्णपणे बंद होता. मात्र, पावसाचा जोर कमी होऊन नदीचे पाणी ओसरताच वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. नदीपात्रापर्यंत पोहोचण्यासाठी जुने रस्ते खराब झाल्याने किंवा प्रशासनाच्या नजरेत येऊ नये म्हणून तस्करांनी एक ‘नामी शक्कल’ लढवली. त्यांनी थेट वनविभागाच्या मालकीच्या क्षेत्रात शिरकाव करून, झाडेझुडपे तोडून वाळू वाहतुकीसाठी नवा मार्ग तयार केला.

जांबुत येथील स्मशानभूमीच्या बाजूने वनविभागाचे क्षेत्र सुरू होते. याच क्षेत्रातून नदीच्या कडेने जेसीबी मशीन लावून रस्ता सपाटीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे, सरकारी जमिनीवर अशा प्रकारे उघडपणे यंत्रसामग्री वापरून रस्ता बनवला जात असतानाही सुरुवातीला कोणाचेही नियंत्रण नव्हते. मात्र, काही सुज्ञ नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.


या गंभीर प्रकरणावर बोलताना वनक्षेत्रपाल (RFO) ताम्हाणे यांनी सांगितले की, “वनविभागाच्या क्षेत्रात रस्ता तयार केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. वनसंपत्तीचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही.

साकूर पठार भागात अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या भागातील वाळू उपसा, मुरूम उत्खनन आणि इतर अवैध धंद्यांना कुणाचे तरी ‘राजकीय संरक्षण’ लाभत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. “आकां”च्या कृपेनेच हे तस्कर प्रशासनाला न जुमानता थेट सरकारी जमिनींवर डल्ला मारत असल्याचे बोलले जात आहे.


आता या प्रकरणी केवळ पंचनामा होणार की प्रत्यक्षात तस्करांच्या मुसक्या आवळल्या जाणार? वनविभाग आणि महसूल प्रशासन या मुजोरीला कसा लगाम लावणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *