एकाच छताखाली मिळणार महसूल विभागाच्या सर्व सेवा

आश्वी । झुंझार न्यूज 

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आता थेट जनतेच्या दारी पोहचणार आहे. आश्वी आणि शिबलापूर महसूल मंडळातील नागरिकांच्या महसूल विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

हे भव्य शिबीर शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी आश्वी बुद्रुक येथील साई लॉन्स व मंगल कार्यालय येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध दाखल्यांसाठी किंवा रेशनकार्डच्या कामांसाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. ही अडचण ओळखून, महसूल विभागाने सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या शिबिरामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा निपटारा केला जाणार आहे


रेशनकार्ड संबंधित कामे: नवीन रेशनकार्ड, नावात बदल किंवा दुरुस्ती, महसूल अभिलेख: ७/१२ आणि ८-अ उतारे मिळवणे, दाखले: विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दाखले, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला आणि जातीचे दाखले.
सामाजिक योजना: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अन्य निराधार योजनांचे अर्ज.
फेरफार: बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले जमिनीचे फेरफार विषयक प्रश्न.


“शासन आपल्या दारी” या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचा लाभ आश्वी आणि शिबलापूर मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे सोबत आणून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांचे शासकीय कामांचे फेरे वाचतील आणि प्रश्न त्वरित सुटण्यास मदत होईल.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *