राहता । झुंझार न्यूज
जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने राहता नगरपालिकेच्या सभागृहात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जनता दरबारा’चे आयोजन करण्यात आले होते. “जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू,” अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी नागरिकांना दिली.

राहता तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी या जनता दरबारात मोठी गर्दी केली होती. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, नागरी सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक विकासाशी संबंधित विविध वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाच्या अडीअडचणी निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.

अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश
जनता दरबारात प्राप्त झालेल्या प्रत्येक निवेदनाची डॉ. सुजय विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी प्रत्येक नागरिकाची समस्या संयमाने ऐकून घेत उपस्थित असलेल्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. जे प्रश्न तातडीने मार्गी लावता येतील, त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले, तर उर्वरित प्रश्नही प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. नागरिकांना वेळेत दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रसंगी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी लोंढे, विविध विभागांचे शासकीय अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासन आणि जनतेत समन्वय
नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील समन्वय अधिक बळकट होतो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. डॉ. विखे पाटील यांच्या या पुढाकारामुळे अनेक प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे .
