पुणे-मुंबईला जाण्याची गरज नाही; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न
आश्वी । झुंझार न्यूज
ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसह विशेषतः मुलींना स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी संगमनेर शहरात ‘गरुड आयएएस ॲकडमी’चा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. या ॲकडमीमुळे आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरली नसल्याचा सूर मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आई-वडिलांच्या हस्ते विधीवत पूजा करून करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा तथा वरवडी गावाच्या सरपंच सौ. किरण गणेश गागरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सौ. मिराताई शेटे, संगमनेर भाजपा शहराध्यक्षा सौ. पायल ताजणे, गुंजाळवाडीचे उपसरपंच सचिन गुंजाळ, देशमुख, दत्तात्रय दुर्गुर्डे, राजेश गायकवाड, गणेश गागरे यांसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. किरण गागरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे-मुंबईला जाणे अनेकदा शक्य होत नाही. घरून परवानगी मिळाली तरी आर्थिक आणि मानसिक अडचणींचा डोंगर त्यांच्यासमोर उभा असतो. नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी संगमनेर असल्याने हे केंद्र मुलींसाठी अत्यंत सोयीचे ठरणार आहे. आता या भागातील मुलीही स्पर्धा परीक्षेत आपले नाव चमकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गरुड आयएएस ॲकडमीची रचना अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात आली आहे. येथे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र विभाग असून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
पुणे-मुंबईत मिळणारे दर्जेदार शिक्षण आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्यामुळे पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. या ॲकडमीमुळे संगमनेरच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली असून, आगामी काळात प्रशासकीय सेवेत या भागातील टक्का वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.