प्रशासनाकडून दखल; शिबलापूर ते पानोडी दरम्यानच्या कामाला वेग

आश्वी । झुंझार न्यूज

पुणे-शिर्डी प्रवासासाठी पर्यायी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आश्वी-पानोडी-शिबलापूर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रेंगाळलेल्या पानोडी गावठाण ते शिबलापूर या टप्प्यातील रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लाभला असून, कामाला वेग आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

पुणे-शिर्डी या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, पानोडी गावठाण ते शिबलापूर या दरम्यानचा रस्ता खोदून ठेवल्याने पावसाळ्यात या भागात ‘चिखलाचे साम्राज्य’ पसरले होते. उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून वाट काढताना शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध आणि वाहनचालकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. शेतकरी आणि दूध उत्पादकांना आपले वाहन या चिखलातून बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागत होती.

एकीकडे महामार्गाचे काम रखडलेले असतानाच, दुसरीकडे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी मुरुम वाहतूक करणाऱ्या मोठ्या डंपरची या मार्गावरून सतत वर्दळ सुरू होती. चिखलामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर या अवजड वाहनांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली होती. यामुळे महिला व मुलांना जीव मुठीत धरून चालावे लागत होते.

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून आपला संताप व्यक्त केला होता. पावसाळ्यापूर्वी नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाने तातडीने हालचाली करत शिबलापूर ते पानोडी या रखडलेल्या टप्प्याचे काम सुरू केले आहे.


सध्या या मार्गावरील कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली असून, चिखलाचा उपद्रव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुणे-शिर्डी प्रवासाचा वेळ वाचणार असून, पानोडी पंचक्रोशीतील दळणवळणाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. रखडलेल्या कामाला मुहूर्त मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, आता हे काम निकृष्ट दर्जाचे न होता वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *