विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; खोडद येथील संशोधन केंद्राच्या तांत्रिक अभ्यासासाठी पाऊल

 

आश्वी । झुंझार न्यूज

 


पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या रेल्वे मार्गात येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि खोडद येथील संशोधन केंद्राच्या अभ्यासासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत. जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले आहे.

समितीची रचना आणि जबाबदारी


राज्य सरकारने जारी केलेल्या निर्णयानुसार, या समितीत अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर काम पाहतील. त्यांच्यासोबत रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता, तसेच पुणे आणि नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) आणि आवश्यक सर्व तांत्रिक माहिती समितीला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘महारेल’वर सोपवण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांना समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

विखे पाटील यांचा पाठपुरावा


पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पावसाळी अधिवेशनात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान खोडद येथील संशोधन केंद्रावर रेल्वे मार्गामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आता सरकारने केली आहे.

औद्योगिक विकासाला चालना मिळणार


या निर्णयाचे स्वागत करताना ना. विखे पाटील म्हणाले की, “पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा केवळ दळणवळणाचे साधन नसून जिल्ह्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची जीवनवाहिनी ठरणार आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. या प्रकल्पासाठी आपण यापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही भूमिका मांडली होती.”

येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. या समितीच्या स्थापनेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा प्रश्न आता तांत्रिकदृष्ट्या सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.