अखंड हरिनाम सप्ताहाची 179 वर्षांची महान परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आजही तितक्याच निष्ठेनं सुरू !
झरेकाठी । झुंझार न्यूज
: गंगागिरी महाराज यांच्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला आज मंगळवारी (25 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं महत्त्व अधोरेखित करत महंत रामगिरी महाराज यांना धमक्या देणाऱ्यांना सडेतोड इशारा दिला.
‘धमकी देणाऱ्यांना सरकार नेस्तनाबूत करेल’ : अखंड हरिनाम सप्ताहाची 179 वर्षांची महान परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आजही तितक्याच निष्ठेनं सुरू आहे. या संप्रदायाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांना धमक्या देणाऱ्यांना आमचं सरकार नेस्तनाबूत करेल. त्यांच्या एकाही केसाला धक्का लागू देणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आम्ही विमानाने येत असताना खाली मोठा समुद्र दिसत होता. मात्र, इथं आल्यानंतर श्रद्धेचा मोठा जनसमुदाय पाहायला मिळत आहे. शतकांपासून आपल्यावर अनेक आक्रमणं झाली. किल्ले जिंकले गेले, मंदिरे तोडली गेली. मात्र, आपल्या सनातन संस्कृतीवर आणि वारकरी परंपरेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.”
“आमची पावले नेहमी पंढरपूरच्या दिशेनेच वळत राहिली. आम्ही कधीही कोणाच्या विचारांचे गुलाम झालो नाही. हरिनामाच्या गजरामुळे आपण सर्व एकत्र येतो. या परंपरेत जात-पात पाहिली जात नाही,” असंही फडणवीस यांनी सांगितलं.
महंत रामगिरी महाराजांनी ही पवित्र परंपरा अत्यंत समर्थपणे पुढे नेली आहे. सरला बेटाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विशेष विकास आराखडा तयार केला असून आगामी काळात हे ठिकाण प्रमुख तीर्थक्षेत्र आणि ऊर्जेचे मोठे केंद्र म्हणून विकसित केले जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आपलं सरकार शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या ताकदीवर उभं असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीची केवळ घोषणा न करता आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले आहेत. दर 15 दिवसांनी नवीन यादी जाहीर करून एकूण 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज दिली जात आहे. लवकरच 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा 8 तास आणि त्यानंतर 365 दिवस दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय शेतकऱ्यांवरील 58 कोटी रुपयांची थकीत वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात आली असून त्याची कोणतीही वसुली केली जाणार नाही, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.