नवनाथ कथा सोहळा भव्य स्वरूपात संपन्न

 

आश्वी : प्रतिनिधी

पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून दाढ बुद्रुक (ता. राहाता) येथे वैकुंठवासी मुकुंददास महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि वरद विनायक सेवाधामचे मठाधिपती महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला ‘हनुमंत अखंड हरीनाम सप्ताह’ व ‘भव्य नवनाथ महाराज कथा सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती स्वामीजी गुरुवर्य अरुणगिरी महाराज यांची रसाळ वाणी. त्यांच्या सुश्राव्य वाणीतून दररोज सायंकाळी ६:३० ते ९ या वेळेत नवनाथ कथेचे श्रवण करण्यासाठी दाढ बुद्रुकसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. महाराजांच्या ओघवत्या शैलीतील निरूपणामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.


सोमवारी रात्री ८ वाजता या सोहळ्याला महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांना अनमोल असे आध्यात्मिक मार्गदर्शन केले. कथेच्या सांगतेनंतर श्रावणी सोमवार आणि एकादशीचा योग साधून भाविकांसाठी ‘खिचडी व झिरके’ या महाप्रसादाचे खास आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.


याप्रसंगी पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक गोरक्षनाथ तांबे म्हणाले की, “पद्मभूषण लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्याला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. तोच वारसा आज आपण अखंडितपणे पुढे चालवत आहोत.” तसेच, कथेच्या प्रांगणात पावसामुळे चिखल होत असल्याने भाविकांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी तातडीने पेव्हिंग ब्लॉक बसवून दिले. या मदतीबद्दल तांबे यांनी ग्रामस्थांच्या वतीने डॉ. विखे पाटील यांचे आभार मानले.


या सोहळ्याला डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक गोरक्षनाथ तांबे, सुनील तांबे, पांडुतात्या बँकेचे अध्यक्ष पांडुतात्या बनसोडे, सरपंच तात्यासाहेब सातपुते, उपसरपंच ॲड. नकुल तांबे, योगेश तांबे, प्रतापराव तांबे, अशोकराव गाडेकर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष भाऊराव गाडेकर, मारुतराव तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा भव्यदिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी दाढ बुद्रुकचे ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळासह विविध संघटनांनी रात्रंदिवस तन-मन-धनाने परिश्रम घेतले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि सेवेमुळे या सप्ताहाची सांगता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झाला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *