शिर्डी । झुंझार न्यूज

रिपब्लिकन पक्षाचे निष्ठावान नेते आणि उत्तर महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजाभाऊ कापसे हे अत्यंत धाडसी आणि लढाऊ नेतृत्व होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत तांत्रिक कारणामुळे माझी सभा होऊ शकली नाही, अन्यथा राजा कापसे श्रीरामपूरमधून बहुमताने निवडून येऊन रिपब्लिकन पक्षाचे आमदार झाले असते,” अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिवंगत राजाभाऊ कापसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांचे १८ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ राहता तालुक्यातील वाकडी या त्यांच्या जन्मगावी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. आठवले बोलत होते.

पँथरपासूनचा सच्चा सहकारी

राजाभाऊ कापसे यांच्या कार्याचा गौरव करताना आठवले म्हणाले की, “राजा हा कधीही ‘नाही’ न म्हणणारा सच्चा कार्यकर्ता होता. दलित पँथरच्या काळापासून त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साथ दिली. मुंबईपासून ते श्रीरामपूरपर्यंत रिपाईची नाळ जोडून ठेवणारे ते एक खर्चिक आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व होते. ते राजकारणात महत्त्वाकांक्षा बाळगणारे पँथर होते आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती होती. रिपब्लिकन चळवळीत ते ‘बापांचा बाप’ होते.”

२००९ च्या निवडणुकीचा तो प्रसंग

जुन्या आठवणींना उजाळा देताना रामदास आठवले यांनी सांगितले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘रिडालोस’तर्फे राजा कापसे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अतिशय प्रबळ झुंज देत २३ हजार मते मिळवली होती. मात्र, त्यावेळी तांत्रिक कारणामुळे आठवलेंचे हेलिकॉप्टर श्रीरामपूरमध्ये उतरू शकले नाही आणि त्यांची सभा रद्द झाली. “जर ती सभा झाली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असते आणि राजा कापसे विधानसभेत दिसले असते,” अशी खंत आठवलेंनी यावेळी व्यक्त केली.


श्रद्धांजली सभेनंतर ना. रामदास आठवले यांनी कापसे कुटुंबीयांची भेट घेतली. राजाभाऊंचे सुपुत्र विक्की, राहुल, राकेश, मुलगी शितल भालेराव व वैशाली शिरसाट आणि बंधू ज्ञानदेव कापसे यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.


या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव होते, तर याप्रसंगी आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, सुरेंद्र थोरात, रमेश शिरकांडे , शिवसेनेचे किशोर वाघमारे, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, पत्रकार राजेश गायकवाड, सुभाष त्रिभुवन , आशिष शेळके, राजेंद्र गवांदे , रमेश गायकवाड, सुनील शिरसाठ, माणिकराव यादव, पप्पू बनसोडे, बाळकृष्ण इंगळे, बाळासाहेब गायकवाड, रमाताई धीवर, प्रकाश जाधव, संजय भालेराव यांच्यासह रिपब्लिकन चळवळीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राजाभाऊ कापसे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीची मोठी हानी झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील एक आक्रमक नेतृत्व हरपल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *