महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम
ग्रामस्थांसह महायुती कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
संगमनेर । झुंझार न्यूज
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त खांडगाव येथे गावातील तरुण, ग्रामस्थ तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन गावातील स्मशानभूमी, जिल्हा परिषद शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच समाजमंदिर परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबवले
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छ, निरोगी आणि सुंदर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. याच विचाराला पुढे नेत खांडगावमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाच्या माध्यमातून ‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असावी’, असा संदेश तरुणांनी या अभियानाच्या माध्यमातून दिला . सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच गावातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत जागरूक राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
विशेष म्हणजे, या अभियानाचा समारोप गावातील स्मशानभूमीमध्ये अल्पोपहाराने करण्यात आला. स्वच्छतेसोबतच सामाजिक एकोपा, श्रमदान व सामूहिक जबाबदारीची भावना जोपासणारा हा उपक्रम ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरला. स्वच्छता, सामाजिक बांधिलकी व गावाच्या विकासासाठी एकत्रित पणे काम करण्याचा सकारात्मक संदेश या अभियानाच्या माध्यमातून तरुणांनी दिला