स्वकर्तृत्वावर पुण्यात उभे केले सॉफ्टवेअर कंपनीचे साम्राज्य; अवघ्या ४०व्या वर्षी काळाचा घाला — आश्वी परिसरावर शोककळा

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

आश्वी खुर्दच्या मातीत जन्मलेला, स्वकर्तृत्वाच्या बळावर पुणे शहरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा आणि आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रात ठसा उमटविणारा युवा उद्योजक गौरव (बन्टी) पांडुरंग गायकवाड यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अवघे ४० वर्षांचे होते.

गौरव गायकवाड हे आश्वी खुर्दचे भूमिपुत्र होते. प्रवरा बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी पांडुरंग मुरलीधर गायकवाड यांचे ते चिरंजीव होत. आश्वी-लोणी परिसरात बालपण गेलेल्या गौरव यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे गाठले आणि आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत व जिद्दीच्या जोरावर इन्फोटेक सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली.

अल्पावधीतच त्यांच्या कंपनीने सॉफ्टवेअर क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपला विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात केला. मुंबई पोलिसांशी संबंधित महत्त्वाचे कामही त्यांच्या कंपनीकडे होते, ही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष मानली जात आहे. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन स्वतःच्या हिमतीवर उद्योगविश्वात स्थान निर्माण करणाऱ्या गौरव यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी होता.

पहाटेची ती बातमी… आणि सगळेच सुन्न झाले

सोमवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास गौरव यांना अचानक त्रास जाणवला. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
अवघ्या चाळिशीत, उमेदीच्या आणि कर्तृत्वाच्या भरात असताना गौरव यांचा असा अचानक झालेला मृत्यू कुटुंबीयांसह मित्रपरिवार, व्यावसायिक क्षेत्र आणि संपूर्ण आश्वी परिसराला चटका लावून गेला आहे.

ज्याने गावातून पुण्याकडे जात स्वतःचे विश्व उभे केले, त्याच भूमिपुत्राने आज अचानक या जगाचा निरोप घेतल्याने आश्वीच्या मातीतही हळहळ व्यक्त होत आहे. गावचा एक कर्तृत्ववान तरुण, एक स्वप्न पाहणारा उद्योजक आणि अनेकांच्या आशेचा आधार काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
गौरव यांच्या पश्चात वडील पांडुरंग गायकवाड, पत्नी, एक मुलगा, एक बहीण, मेव्हणे, चुलते श्रीरंग गायकवाड, संपत गायकवाड, बंधू अजिंक्य गायकवाड, पियुष गायकवाड, आशिष गायकवाड तसेच आश्वी खुर्द जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता गायकवाड यांच्यासह मोठा परिवार आहे.

गौरव गायकवाड यांच्यावर आश्वी खुर्द येथील प्रवरा नदीतीरी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले
गौरव यांच्या निधनाची वार्ता समजताच आश्वी खुर्दसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *