शिर्डी येथे आयोजित श्री साईबाबा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राहुरी तालुक्यातील निंभोरे येथील रहिवासी आणि पुणे येथील मॉडर्न लॉ कॉलेजची विद्यार्थिनी कु. प्रियांका विजय सिनारे हिने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
स्पर्धेत प्रियांका सिनारे हिने आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीसह ओघवत्या वक्तृत्वातून आणि प्रभावी अभिव्यक्तीच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकली. स्पर्धेसाठी ‘श्रद्धा आणि सबुरी’, ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात श्री साईबाबांच्या विचारांची गरज’ तसेच ‘सबका मालिक एक : राष्ट्रीय एकात्मतेचा मूलमंत्र’ हे विषय देण्यात आले होते.
प्रियांका हिने विषयांचा सखोल अभ्यास करून प्रभावीपणे मांडणी केली. तिच्या वक्तृत्वातील आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता आणि प्रभावी सादरीकरणामुळे तिला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रियांका सिनारे हिला ₹११ हजारांचे रोख पारितोषिक, श्री साईबाबा चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
“विचारांना व्यासपीठ, वक्तृत्वाला नवी दिशा आणि तरुणाईला प्रेरणेची ऊर्जा” अशी ओळख निर्माण करणाऱ्या या यशामुळे सिनारे कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रियांका सिनारे हिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शिक्षक तसेच विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.