{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

अखिल भारतीय किसान सभेचे २४वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे सुरू

 

कोल्हापूर । झुंझार न्यूज

 

छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांची भूमी असलेल्या कोल्हापूर नगरीत अखिल भारतीय किसान सभेचे २४वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन सुरू झाले आहे. ६, ७ आणि ८ ऑक्टोबर असे तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातून सुमारे ४०० शेतकरी नेते, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

अधिवेशनाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला भेट देऊन त्यांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर शहरातून किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले. किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाच्या उदघाटन सत्राला सुरुवात झाली.

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन, माजी आमदार जे. पी. गावीत आणि आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन होत आहे. उद्घाटन सत्रात स्वागताध्यक्ष विक्रांत पाटील, सहस्वागताध्यक्ष बाबासाहेब देवकर आणि राष्ट्रीय सरचिटणीस यांनी स्वागत केल्यावर विजू कृष्णन यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले. उदय नारकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे अधिवेशनाला मार्गदर्शन करणार आहेत. जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर या अधिवेशनाला शुभेच्छा देणार आहेत.

*शेती संकटाचा आढावा आणि पुढील आंदोलनाची दिशा*

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले अधिवेशनात संघटनेचा राजकीय, वैचारिक, संघटनात्मक आणि कार्याचा अहवाल मांडणार आहेत. या अहवालावर राज्यभरातून आलेले प्रतिनिधी गांभीर्याने चर्चा करून किसान सभेच्या आगामी आंदोलनाची आणि संघटनात्मक विस्ताराची दिशा निश्चित करतील.

गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शेती अरिष्ट, केंद्र व राज्य सरकारची शेतकरीविरोधी धोरणे, शेतीवर होणारे पर्यावरणीय बदलांचे परिणाम, देशातील राजकीय परिस्थिती, शेतकरी चळवळीसमोरील आव्हाने यावर तीन दिवस प्रतिनिधी सखोल चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्रातील शेतीचे प्रश्नही अधिवेशनाच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. भीषण दुष्काळ, पीक विमा, कर्जमाफी, शेतजमिनीची मालकी, शेतीमालाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे. या प्रश्नांवर अधिवेशनानंतर राज्यभर जोरदार शेतकरी आंदोलन उभारण्याची हाक दिली जाणार असून, पुढील तीन दिवसांच्या चर्चेत या आंदोलनाची सविस्तर आखणी केली जाणार आहे.

शेतकरी आणि शेतीसमोरील संकट अधिक तीव्र होत असताना केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना पर्याय देणारी शेतकरी चळवळीची भूमिका निश्चित करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक संघर्ष उभारणे आणि किसान सभेची संघटनात्मक ताकद वाढवणे, हा या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *