संगमनेर : झुंजार न्यूज
ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत तालुक्यातील वरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पिंपळगाव देपा पंचायत समिती गणाचे गणप्रमुख कैलास साहेबराव पाटोळे (वय ४५) हे जागीच ठार झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार (दि.१६) एप्रिलच्या सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कैलास पाटोळे हे दुचाकीवरून वरंवडी फाट्यावरुन वरवंडी गावाकडे जात होते. यावेळी ते भोसले वस्ती नजीक आले असता समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रँक्टरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत कैलास पाटोळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी कैलास पाटोळे यांना तात्काळ उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र उपचारापुर्वीच कैलास पाटोळे यांचे निधन झाले होते.लहानपणापासून कैलास पाटोळे हे शिवसेनेत सक्रिय होते. पठार भागात शिवसेनेचे संघटन वाढविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती. वरवंडी गावाच्या विकास कामातही ते नेहमी मोलाचे सहकार्य करत होते. त्यांच्या निधनाची माहिती कळताच जुन्या जाणत्या शिवसैनिकानी शोक भावना व्यक्त केल्या आहेत. कैलास पाटोळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय, चुलते असा मोठा परिवार असून काल सोमवारी दुपारी वरंवडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट तसेच विविध संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवंरासह पंचक्रोशीतून आलेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
