मदुराई : झुंजार न्यूज
बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी स्वयंरोजगारा बरोबर लघु उद्योगाला प्राधान्य दिले पाहिजे. देशभर रोजगार निर्मीतीसाठी लघुउद्योगाची चळवळ उभारली पाहिजे. शिवाकाशी येथील श्री कालेश्वरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज हा उद्योग समूह उद्योग जगतातील आदर्श उदाहरण ठरला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
तामिळनाडुतील शिवाकाशी येथील 1923 मध्ये कालेश्वरी श्री. कालेश्वरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात आली. या उद्योग समुहाला 100 वर्ष यावषी पुर्ण झाल्याबद्दल शतक महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते श्री. कालेश्वरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या शतक महोत्सवा निमीत्त काढण्यात आलेल्या टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. मदुराईचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल व्ही.एस. के. शंकर ; श्री. कालेश्वरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे डायरेक्टर श्री. ए.पी. सेल्वराजन आणि संभुगनाथन उपस्थित होते. तसेच रिपाइंचे तामिळनाडु प्रदेशाध्यक्ष फादर एम.ए. सुसाई उपस्थित होते.

श्री. कालेश्वरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने तामिळनाडु शिवाकाशी येथे 1923 मध्ये सर्वप्रथम माचीस बॉक्स (काडीपेटी) फॅक्टरीचा शुभारंभ केला. शिवाकाशी हा भाग दुष्काळग्रस्त भाग आहे तसेच सदर जमीन नापीक होती. त्यामुळे या भागात रोजगाराची कोणतीही संधी स्थानिकांना नव्हती. कालेश्वरी उद्योग समुहामुळे या भागात स्थानिकांना रोजगार मिळु लागला. आणि काडीपेटीच्या कारखान्यानंतर फटाके निर्मितीचे कारखाने सुरु करण्यात आले. कालेश्वरी उद्योग समुहाने स्थानिकांना मोठया प्रमाणात लघु उद्योग दिले आहेत. काडीपेटी आणि फटाक्यांचे 30 कारखाने कालेश्वरी उद्योग समुह चालवीत आहे. लघु उद्योगाच्या माध्यमातुन स्थानिकांसाठी कालेश्वरी उद्योग समुहाने मोठी रोजगार निर्मीती केली आहे. या उद्योग समुहाचे उत्पादन जपान, अमेरिका अशा परदेशातील राष्ट्रात निर्णयात होते.

स्वदेशी उत्पादन क्षेत्रात देशभरात कालेश्वरी उद्योग समुहाने आदर्श उदाहरण उभे केले आहे असे गौरवोद्गार ना. रामदास आठवले यांनी यावेळी काढले. कालेश्वरी उद्योग समुहाच्या केरळ, महाराष्ट्र, तेलंगाना देशभरातील वितरकांचा सत्कार ना. रामदास आठवले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.या उद्योग समुहाच्या महिला आणि पुरुष कामगारांना गणवेशाचे वितरण ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

श्री. कालेश्वरी उद्योग समुहाच्या शाळा आणि कॉलेज सुध्दा आहेत त्यामध्ये 3000 विद्याथी शिकत आहेत. त्यापैकी काही विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हजारेंच्या संख्येने तेथे लोक उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली.
