संगमनेर : झुंजार न्यूज
नुकत्याच पार पडलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत निवडून आलेले संचालकांमधून आज चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक किसन केशव थोरात उर्फ के. के. थोरात यांची तर व्हा. चेअरमनपदी उद्योजक राहुल दत्तात्रय गडगे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.

तालुक्याच्या प्रगतीमध्ये महत्वाचा वाटा असलेली संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीची निवडणूक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, यामध्ये माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाचे सर्वच्या सर्व १३ उमेदवार निवडून आले. या निवडणूकीत तरुण उद्योजकांचा सहभाग महत्वाचा ठरला होता. आज दि. ३० मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी संचालक सोमनाथ पाबळकर यांनी अनुक्रमे के. के. थोरात व राहुल गडगे यांचे नाव सुचविले तर मावळते चेअरमन भाऊसाहेब एरंडे यांनी या नावांना अनुमोदन दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. वाकचौरे यांनी ही नावे जाहिर केली.

नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी यावेळी सांगितले की, संस्थेच्या सर्वांगिण विकासासाठी संचालक मंडळाला सोबत घेऊन आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, संस्थेसंबंधीत महत्वाची कामे लवकरात लवकर मार्गी लावून संस्थेला तालुक्यात मानाचा दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.

या निवडीबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, संगमनेर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाजार समितीचे अध्यक्ष शंकर पाटील खेमनर आदि मान्यवरांनी अभिनंदन केले.
