दंडकारण्य अभियानामुळे वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली

संगमनेर : झुंजार न्यूज 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली दंडकारण्य अभियान ही मोठी लोक चळवळ ठरली आहे. कोरोना संकट काळात ऑक्सिजन व निसर्गाचे महत्त्व सर्वांना कळले असून दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही अत्यंत गरजेचे असून या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन माजी शिक्षण व कृषिमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक मा. आ. डॉ सुधीर तांबे, प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे ,बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, शंकरराव खेमनर ,सभापती सौ सुनंदाताई जोरवेकर, प्रा. बाबा खरात ,मोहनराव करंजकर, ॲड. मधुकरराव गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे सह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, दंडकारण्य अभियान ही संगमनेर तालुक्याची ओळख बनली आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध डोंगरांवरती मोठी वनराई झाली. असून तालुक्यामध्ये वाढलेले वृक्षांचे प्रमाण व वृक्ष संवर्धन संस्कृती ही इतरांसाठी आदर्शवत आहे. हवामान विभागाने यावर्षी अल निनोमुळे कमी पाऊसमान सांगितला आहे. वाढलेली उष्णता, कमी झालेला पाऊस यावर वृक्षारोपण व संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

वृक्षारोपणाचे हे अभियान तालुक्यात मोठा उत्सव म्हणून साजरा होतो आहे. यावर्षीही गावोगावी कार्यकर्ते शालेय विद्यार्थी या सर्वांनी सहभाग घ्यावा. तसेच घराच्या परिसरात नारळ, लिंबू,जांभूळ, शेवगा, आंबा, चिंच अशी बहुउपयोगी वृक्षांची लागवड करावी. तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणा बरोबरच चंदनापुरी घाट, क-हे घाट, माहुलीघाट कोची घाट यामध्येही रंगीबेरंगी फुलांचे रोपण करावे. आपला परिसर हिरवाईने फुलवण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

तर मा.आ.डॉ. तांबे म्हणाले की, आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग दिला असून यामुळे तालुक्यात वृक्षराई वाढली आहे. कोरोना संकट काळात ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवली पुढील पिढ्यांसाठी ऑक्सिजन निर्मिती करता वृक्ष संवर्धन ही अत्यंत गरज आहे. प्रत्येकाने आपली मूलभूत कर्तव्य म्हणून या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाले की या अभियानात महिलांचा सहभाग ही महत्त्वाचा असून घर परिसरात कडीपत्ता लिंबू आवळा अशी उपयोगी झाडे लावून त्यांचे संगोपन करा यावर्षी तालुक्यात 1100 वटवृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला शासकीय विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed