संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द व परिसरात दोन महीन्यामध्ये बिबट्या व मनुष्य यातील संघर्ष वाढला असून मागील एक महीन्यात चार ते पाच वेळा परिसरात बिबट्याकडून मनुष्यावर हल्ले झाले . शुक्रवार दि. २१ जुलै रोजी सकाळी बिबट्याने पुन्हा रस्त्यावरुन जात असलेल्या एका वृध्द व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे मोठी खळबळ उडाल्याने वनविभाग खडबडून जागे होत तीन पिंजरे ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या ठिकाणी पिंजरे लावून परिसरातील भीती करण्याचा प्रयत्न केला .
दाढ खुर्द शिवारातील शिंगोरे वस्ती जवळून ६५ वर्ष वयाचे पोपट उर्फ रामा कारभारी पर्वत हे जेष्ठ ग्रहस्थ नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ६. १५ वा. घराकडून व्यवसायानिमित्त गिरणीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या झूडूपात शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्याना झूडूपात ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी या जेष्ठ व्यक्तीने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे त्यांचा आवाज ऐकून किशोर जोशी व नारायण शिंगोरे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान दाखवत या बिबट्याला हुसकावून लावले. त्यामुळे या जेष्ठ व्यक्तीची या बिबट्याच्या जबड्यातून मुक्तता झाली अन्यथा मोठा प्रसंग ओढवला असता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
यावेळी स्थानिकाच्या मदतीने मुलगा संजय पर्वत व पुतणे विकास पर्वत यांनी दाढ बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात पोपट पर्वत यांच्यावर प्राथमिक उपचार घेऊन नगर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. तर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानतंर वनविभागाने काही दिवसांपूर्वी याठिकाणी पिंजरा लावला खरा पण बिबट्यासाठी कोणतेही भक्ष्य या पिंजऱ्यात न ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येताना दिसली
मागील काही दिवसांतील हल्ल्याच्या घटना पाहता मनुष्य व बिबट्या यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याआधी वनविभागाने वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या परिसरात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंच सतिष जोशी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, नितिन पाबळे, नारायण शिंगोरे, विलास पर्वत, संजय पर्वत, रामदास जोशी, संपत जोशी, आकाश जोशी, संदिप झनान, बाबासाहेब शिंगोरे, सुनील जोशी, सुरेश जोरी, दगडू साळवे, मनोहर जोशी आदिसह उपस्थित स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल सुहास उपासणी, वनरंक्षक हरिश्चंद्र जोजार, बी. सी. चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी करून आणखी दोन पिंजरे या ठिकाणी लावल्याने परिसरातील लोकांना सुटकेचा श्वास जरी घेतला तरी सावधगिरीने रहा असे आवाहन वनाधिकारी सुहास उपासणी यांनी केले आहे .
