संगमनेर । झुंजार न्यूज



महसूल विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजना विद्यार्थ्यांमार्फत लोकांपर्यंत पोहचविणे व खऱ्या गरजू समाजाला शासकीय योजनांची माहिती करून देणे व त्या योजनांचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे असा अत्यंत स्तुत्य उपक्रम संगमनेरचे उपविभागीय अधिकारी श्री.शैलेश हिंगे यांच्या संकल्पनेतून साकारला जात आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून सदर महाविद्यालयांशी परस्पर सामंजस्य करार करून सदर योजनेचा प्रारंभ आज दिनांक ७/०८/२०२३ रोजी करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षरी होऊन सदर योजनेची मुहूर्तमेढ मा.जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांचे उपस्थित करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना मा.जिल्हाधिकारी यांनी “उन्नतीसाठी युवक हाच दुवा” हे महसूल विभागाचे ब्रीदवाक्य खरे सार्थ करायचे असेल तर महाविद्यालयीन युवक हा समाज व शासन यांच्यामधील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो असे विचार व्यक्त केले. सदर सामंजस्य करार हा महाविद्यालयाच्या नॅक मानांकनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो व महाविद्यालयाला त्याचा मानांकनासाठी देखील उपयोग होऊ शकतो. यासाठी सर्व महाविद्यालयांनी या सामाजिक उपक्रमामध्ये आपले योगदान द्यावे व योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी संगमनेर उपविभागीय अधिकारी श्री.शैलेंश हिंगे, अकोले उपविभागीय अधिकारी कु.नुतन पाटील तसेच संगमनेर व अकोले विभागातील महाविद्यालयांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *