संगमनेर । झुंजार न्यूज 

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 23 या कालावधीमध्ये संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर व संगमनेर शहरातील प्रत्येक वार्डात काँग्रेसची जनसंवाद यात्रा होणार असून या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा उलगडा केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे व सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.

यशोधन कार्यालय येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जनसंवाद यात्रेच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी समवेत इंद्रजीत भाऊ थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे , यांच्यासह काँग्रेसचे  विविध पदाधिकारी होते.

यावेळी बोलताना कानवडे म्हणाले की, केंद्र सरकार हे संपूर्ण आघाड्यावर अपयशी ठरले असून देशांमध्ये बेरोजगारी व महागाई वाढली आहे मणिपूर अशांत असताना सरकार मात्र शांत आहे. फक्त फसव्या घोषणा दिलेल्या या सरकारने जनमत गमवले असून या सरकारचा अपयशाचा पाढा वाचला जाणार आहे.

याचबरोबर महाराष्ट्रात अत्यंत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून विद्यमान सरकार मात्र आरोप प्रत्यारोप करत आहेत. मागील वर्षीचे नुकसानीचे कोणतेही भरपाई शेतकऱ्याला मिळाली नाही. कांद्याचे अनुदान मिळाले नाही .उलट यावर्षी सर्वत्र दुष्काळामुळे टंचाई निर्माण झाली आहे .याबाबत सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होत नाही. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. सर्वसामान्य दिलासा मिळावा यासाठी महागाई कमी व्हावी. युवकांना रोजगार मिळावा या विविध मागण्यांसह काँग्रेसने 75 वर्षात केलेल्या दैदिप्यमान कारकर्दीचा आढावाही घेतला जाणार आहे.

या जनसंवाद पदयात्रेत
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांचे सह संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर गावांमधील  व शहरांमधील प्रत्येक वार्डात होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होणार आहे .

प्रत्येक गावात सकाळी 9 ते 11 या वेळेत जनसंवाद यात्रा अंतर्गत पदयात्रा व घरोघरी भेटी अभियान होणार आहे .याचबरोबर प्रत्येक गावात कॉर्नर सभा ही होणार आहे. तर संगमनेर शहरांमध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पदयात्रा होणार आहे

तरी या जनसंवाद यात्रेत तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, नगरसेवक, युवक नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संगमनेर तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed