संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी देशातील एकात्मता व लोकशाही टिकवण्यासाठी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त जिल्हा काँग्रेसच्या वतीने संगमनेर मध्ये गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वा. विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे व शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, देशात वाढलेली बेरोजगारी, महागाई ,आर्थिक संकट, मणिपूर सह इतर राज्यांमध्ये निर्माण झालेली अशांतता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न, महिलांची सुरक्षितता, भारताच्या भूभागावर चीनचे होणारे आक्रमण यांसह विविध प्रश्नांमुळे देशांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. याबाबत जनजागृतीसह अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खा राहुल गांधी यांनी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेर शहरांमध्ये भव्य पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संगमनेर नगरपालिका येथून सुरू होणाऱ्या या पद यात्रेमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, शहराध्यक्ष किरण काळे, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संगमनेर नगरपालिका येथून 5 वा. सुरू होणारी पदयात्रा बाजारपेठ- सय्यद बाबा चौक- मेन रोड- चावडी- अशोक चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड अशी होणार आहे.
सायंकाळी 6 वाजता नवीन नगर येथे भव्य जाहीर सभा होणार आहे.
तरी या पदयात्रा व जाहीर सभेसाठी तालुका व शहरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी युवक महिला काँग्रेसच्या सर्व सेलचे सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे
