शिर्डी । झुंजार न्यूज

 

राज्यात सध्या कांदा निर्यातबंदीवरुन शेतकरी आक्रमक झालेत. एकीकडे अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला असतानाच सरकारकडून कांदा निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे महामार्ग अडवत ठाकरे गटाने आंदोलन केले.

कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाच्या दरवाढीसाठी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. आज (शुक्रवार, १५ डिसेंबर) महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Rashakrishna Vikhe Patil) यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केला.

जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी कोल्हार गावातील नगर- मनमाड महाार्गावर रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीही झाली.

 यावेळी बोलताना ठाकरे गटाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ” कांद्याचे, दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी दुःखी आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथा आम्ही मांडलेल्या आहेत. सरकारने यावर तोडगा काढावा. याबाबत निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल.. असा इशाराही भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *