सह्याद्री संस्थेच्या मराठी माध्यमातून गुणवंत विद्यार्थी – कवी भरत दौंडकर
सह्याद्री विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर हे गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र आहे. शब्दांच्या उच्चारांवरून विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त होत असून या विद्यार्थ्यांना भाषेची चांगली जाण आहे. इंग्रजी ही भाषा काळाची गरज असली तरी मराठी भाषेमधून अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले जात असून सह्याद्री विद्यालयाच्या माध्यमातून गुणवंत व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विद्यार्थी घडत असल्याचे गौरव उद्गार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी भरत दौंडकर यांनी काढले आहे.
यावेळी बोलताना कवी दौंडकर म्हणाले की, मराठी माध्यमातील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत आहे आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे मोठे शैक्षणिक केंद्र झाले असून गुणवत्ता ही इथली ओळख ठरली आहे. विद्यार्थ्यांना भाषेची चांगली जाण असून कुठे दाद द्यावी आणि कुठे थांबावे हे कळले अत्यंत गरजेचे आहे पालक आणि विद्यार्थी यामध्ये कायम संवाद गरजेचा असून बैलावाणी राबणारा बाप गायी वाणी होता, हात त्याचा खरबूडा पण आई वाणी होता ही कविता सादर करून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले तर लेकीचे महत्त्व सांगताना लेख सासरचा वासा, माहेरची मेड, सांगून कविता गायली तर शहरालगत जमिनी विकून मोठे होणाऱ्यांवर टीका करताना ते म्हणाले की गुंठा गुंठा जमीन विकून गोप घातली गळ्यात, एक प्लेट मातीचा वास सांगायला रक्त येईल डोळ्यात यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे आले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरता सर्व सुविधा पुरविल्या जात असून प्रत्येकाने वेळेचे नियोजन करा. अभ्यासासाठी वेळ निश्चित करून व्यायाम करा ,छंद जोपासा असे सांगताना मोठे स्वप्न पहा असेही विद्यार्थ्यांना सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांनी रंगीलो मारो राजस्थान ,पंजाबी भांगडा, आसामी बिहू नृत्य ,महाराष्ट्राची लावणी, कोळीगीते, समूह नृत्य, गायन, वादन अशा विविध कलाविष्कारांमधून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. तर महाराष्ट्राची परंपरा दाखवताना सादर झालेली गवळण ,वाघ्या मुरळी आणि देवीचा गोंधळ यांनी अक्षरशः धमाल उडवली.
यावेळी शिक्षक प्रतिनिधी आप्पासाहेब दिघे ,शहाबाई सोनवणे ,भाऊसाहेब सानप ,मिलिंद आवटी, तुषार गायकर, सुनील उकिरडे,नामदेव कहांडळ, उमेश नेहे आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य के.जी खेमनर यांनी केले सूत्रसंचालन वीरेश नवले यांनी केली तर एस एम खेमनर यांनी आभार मानले.यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
