कोपरगांव । झुंजार न्यूज

कोपरगांव तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलिन संत श्री रामदासी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यतिथी निमीत्त किर्तन महोत्सवासह ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत आयोजन करण्यांत आले असल्याची माहिती समस्त रामदासी बाबा भक्त मंडळ, व भजनी मंडळ तिर्थक्षेत्र कोकमठाण येथील गांवक-यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली.
         
त्रंबकेश्वर येथील आनंद आखाडयाचे श्री श्री १००८ गणेशानंद सरस्वती महाराज, सज्जनगडाचे माजी व्यवस्थापक व खातगांव कर्जतचे कार्याध्यक्ष समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता देवगड दत्त देवस्थानचे उत्तराधिकारी गुरूवर्य स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होईल. 
         
 
त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, या सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकडआरती, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक हरिपाठ व रात्रौ ७ वाजता किर्तन याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांसाठी गायनाचार्य हभप रामभाउ महाराज चौधरी, अरूण महाराज पगारे, व्यासपीठचालक हभप तुकाराम महाराज वेलजाळे यांची साथ लाभणार आहे.
         
२८ जानेवारी रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प पू रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलश व ग्रंथ पुजनाने या पुण्यतिथी सोहळयाचा शुभारंभ होत आहे. हभप उत्तम महाराज गाडे (२८ जानेवारी), हभप अमोल महाराज गाडे (२९ जानेवारी), गुरूवर्य रामानंदगिरी शास्त्री (३० जानेवारी), हभप रामनाथ महाराज पवार (३१ जानेवारी), हभप हरिशरणगिरीजी महाराज (१ फेब्रुवारी), डॉ शुभम महाराज कांडेकर (२ फेब्रुवारी), हभप उध्दव महाराज मंडलिक (३ फेब्रुवारी) यांचे रात्रौ सप्ताहभर किर्तन होईल. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत प. पू. रामदासी महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ मिरवणुक काढण्यांत येणार आहे.
         
या सप्ताह काळात महंत स्वामी शिवानंदगिरी महाराज (मंजुर), जंगलीदास माऊली, रमेशगिरी महाराज (कोपरगांव बेट), रामानंदगिरी महाराज (पुणतांबा), गणेशानंद महाराज (जालना), प्रसादबुवा रामदासी (खातगांव), राघवेश्वरानंद महाराज (कुंभारी), रामदास महाराज वाघ, भगवतानंदगिरी महाराज (कोकमठाण), महेंद्रपुरी महाराज (हनुमान टेकडी) मुकुंद महाराज (भगुरकर), श्रध्दानंद महाराज (महांकाळ वाडगांव), विठठलानंद महाराज (कारवाडी) गणपत महाराज लोहाटे (कोपरगांव) आदि संत-महंतांची प्रामुख्यांनी उपस्थिती राहणार आहे.
           
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कोकमठाण येथील रामदासी महाराज भक्त मंडळ प्रयत्नशिल आहेत. नेवासा येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे सर यांनी ब्रम्हलिन संत रामदासी महाराजांच्या जीवन कार्यावर कृष्णा गोदाकाठचे योगी, तीनखणीचा रामानुभव, समर्थविचारधारा या तीन पुस्तकांचे लेखन केलेले आहे. 
           
४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत रामदासी महाराज समाधीस्थानावर सौ. रजनी व सुरेश कचेश्वर भिडे यांच्या हस्ते लघु रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यांत आले आहे. तेंव्हा भाविकांनी या सर्व कार्यकमाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed