नेवासा । झुंजार न्यूज
नेवासा तालुक्यातील सोनई येथे अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना निंदनीय असून या गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे आणि ही घटना चर्चमध्ये घडलेली नसतांना विनाकारण समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करुन पास्टर सुनिल गंगावणे आणि संजय वैरागर यांच्यावर पोलीसांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा तपास गुप्तचर यंत्रणेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी ११ वाजता नेवासा तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी बोलतांना केली.
रिपाईच्यावतीने नेवासा तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोचर्चामध्ये एकलव्य संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढवळे, मराठा मिशनचे डी.जी. भांबळ, छाया भोसले, प्रविण शिंदे, शामवेल साळवे, प्रविण नितनवरे, अनिल नन्नवरे, संतोष मोरे, नितीन भालेराव, संदिप चाबुकस्वार, रिपाईचे नेवासा तालुकाध्यक्ष सुशिल धायजे, पप्पू इंगळे यांच्यासह तालुक्यातील ख्रिती पास्टर, महिला भगिनी व लहूजी सेना व एकलव्य संघटनेचे पदाधिकारी यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नेवासा बसस्थानकापासून शांततेच्या मार्गाने निघालेला हा मोर्चा नेवासा तहसिल कार्यालयावर येवून धडकला आणि या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात हे बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, असे का घडत आहे ? याला पाठबळ कोण देते ? असे सांगून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहीजे व अत्याचाराचे छायाचित्रण करणाऱ्याला या गंभीर गुन्ह्यात सहआरोपी करण्याची मागणी यावेळी थोरात यांनी बोलतांना केली.

ते पुढे म्हणाले की, दलीत आदिवासी बांधवांवर अन्याय – अत्याचारांच्या घटनेत सध्या मोठी वाढ झालेली आहे. सोनईच्या अत्याचार प्रकरणात पोलीसांनी या गुन्ह्यात विनाकारण पास्टर सुनिल गंगावणे व संजय वैरागर यांचा संबंध नसतांनाही त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. ही घटना चर्चमध्ये घडलेली नसतांनाही ती कशी काय चर्चमध्ये घडल्याचे दाखविण्यात आले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. निरापराध लोकांवर दाखल केलेले खोटे गुन्ह्याचा सखोल तपास पोलीसांनी करुन विनाकारण धार्मिक भावना भडकाविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी बोलतांना एकलव्य संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री शिवाजीराव ढगळे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था संभाळण्याचे काम पोलीस करत असतांना दोन –चार दिवसांपुर्वी जिल्ह्यातील एका आमदाराने नेवाशात येवून पोलीस माझे भाषण रेकॉर्ड करत असले तरी माझे कोणी काही करु शकणार नाहीत? अशा शब्दात माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे नांव न घेता केलेल्या टिकेची मोर्चेकऱ्यांना यावेळी ढवळे यांनी आठवण करुन दिली. आता तर थेट कायद्याच्या राज्यात पोलीसांनाच आव्हाण दिले जात असल्याचे आश्चर्यही यावेळी ढवळे यांनी व्यक्त करुन सोनई येथे घडलेल्या घटनेचा निषेध करत खोटी गुन्ह्याचा योग्य तपास करण्याची मागणी त्यांनी केली. या मोर्चामध्ये बौद्ध, आदिवासी, ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यावेळी मोर्चाकऱ्यांच्यावतीने निवेदन दिण्यात आले.
