संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेरातील कत्तलखान्यावर अनेकदा कारवाया झाल्या. या शेकडो कारवायात मोठे मासे सोडून पंटरवर गुन्हे दाखल झाले. तरीही येथील कत्तलखाने बंद होण्याचे नाव घेत नाहीत. येथील कसाई पोलिसांच्या नाकावर टिच्चुन शेकडो मुक्या जनावरांच्या गळ्यावर दररोज सु-या चालवत आहेत. त्यामुळे संगमनेरचे कत्तलखाने राज्यात नव्हे देशात प्रसिद्धीस पावले आहेत. सोमवारी तालुका पोलिसांनी तालुक्यातील कसारे शिवारातून आयशर ट्रक मधून विक्रीसाठी जात असलेले गोमांस जप्त केले. हे करत असताना पोलिसांनी पाच टन गोमासांची पोलिस दप्तरी नोंद केली. मात्र बजरंग दलाच्या कार्यकत्यांनी प्रखर भूमिका घेत या आयशर टेम्पोचे वजन काट्यावर वजन केले असता ५ टन नव्हे तर १३ टन गोमांस टेम्पो मध्ये आढळले.

संगमनेरात मुक्या जनावरांची कत्तल करून गोमांस भरून जात असलेला आयशर ट्रक (एम एच १७ बी.वाय ७८२४) बजरंग दलाचे कार्यकर्ते शामप्रसाद थोरात, श्याम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कानडा यांच्यासह काही कार्यकत्यांनी तालुक्यातील कासारे गावच्या शिवारात जांभूळवाडी फाटा ते काकडी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान रोखून धरला होता. याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र पालवे व दत्तात्रय बडधे घटनास्थळी गेले. गोमासांची वाहतूक केली जात असल्याच्या कारणावरून जाहीर खान नसीर खान पठाण (वय ४९, रा. मोगलपुरा, संगमनेर) आणि आयुब मेहबूब कुरेशी (वय ५३, रा. कुरण रोड, इस्लामपुरा, संगमनेर) या दोघांना ताब्यात घेत गोमांसाने भरलेला आयशर ट्रक पोलीस ठाण्यात आणला. आरोपींना अटक करत ५ टन गोमांस असल्याचे फिर्यादीत नमूद केले. मात्र ट्रक मधील गोमांसाची विल्हेवाट लावण्यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रकचे पुन्हा एकदा वजन करण्यास पोलिसांना भाग पाडले. या वेळी या ट्रकमध्ये ५ टन नव्हे तर १३ टन गोमांस असल्याचे समोर आले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या जागृरकतेमुळे पोलिसांना पुन्हा सुधारित आकडेवारी दाखवावी लागली.

चौकट
पोलिस संशयाच्या फेऱ्यात.!
पोलिसांनी गुन्हा दाखल करतेवेळी आयशर ट्रक मध्ये असलेल्या गोमांसाच्या वजनाची खात्री न करताच अंदाजे पाच टन वजन दाखविण्याचा उद्योग कशासाठी आणि कोणासाठी केला. हा प्रश्न निर्माण झाला आहे. मूळ वजनापेक्षा कमी वजन दाखवून तब्बल आठ टन गोमांस पोलीस दप्तरातून गायब करण्याचा पोलिसांचा नेमका हेतू काय होता? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
