संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा, चंदनापुरी, झोळे, निमगाव टेंभी, सोलापूर, रायतेवाडी गावात नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी ग्रामपंचायतसह ग्रामस्थांनी वनविभागाकडे करूनही त्याची अंमलबजावणी न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बिबट्याने ओवी या दीड वर्षाच्या चिमुकलीचा बळी घेतल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थ व ओवीच्या नातेवाईकांनी केली आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सचिन गडाख शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात. बुधवारी दुपारी त्यांची पत्नी स्वाती गाईंसाठी घास कापण्यास शेतात गेल्या होत्या. सोबत त्यांची मुलगी दीड वर्षाची ओवी होती. तिला बांधावर ठेऊन त्या घास कापत होत्या. ओवी बांधावर खेळत असतानाच अचानक बिबट्याने तिच्यावर झेप घेत तिला जबड्यात पकडून जवळच असलेल्या गवतात घेऊन गेला. हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी पाहिला. ओवीच्या आईनेही पाहिले आणि त्यांनी आरडाओरड केली. बघ्यांनी तेथे गर्दी करत गवताकडे धाव घेतली. बिबट्याने चिमुरडीला तेथेच सोडून धूम ठोकली. ओवीला उपचारासाठी शहरातील रूग्णालयात दाखल केले असता त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हिवरगाव पावसा परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामपंचायतने वन विभागाकडे केली होती. पिंजरा शिल्लक नाही, असे त्यांना तोंडी सांगण्यात आले. या घटनेमुळे ग्रामस्थ व गडाख परिवाराचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. वनविभागाने या गडाख परिवाराला तात्काळ शासनाची मदत मिळवून द्यावी, अशी मागणी सरपंच सुभाषराव गडाख, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, भाजपचे युवा नेते गणेश दवंगे यांनी केली आहे. दरम्यान माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील , माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी सचिन गडाख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

दहशतीने मुले शाळेत गेलीच नाहीत…
ओवी या लहान चिमुकिलीवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना सायंकाळी शाळेतून घरी आलेल्या मुलांनी पाहिली. त्यामुळे मुले घाबरली आहेत. त्यामुळे ते शाळेत जाण्यास तयार नाहीत. हिवरगाव पावसा येथील घटना घडलेल्या ठिकाणावरील तसेच गावातील इतर ही मुले शाळेत गेली नाही, एवढी दहशत मुलांमध्ये निर्माण झाली आहे

हिवरगांव पावसा व परिसरात जेथे ओवी गडाख ठार झाली. तेथे विठ्ठल कुंडलिक गडाख यांच्या शेतात एक आणि शिवराज अण्णासाहेब पावसे यांच्या शेतातजवळ दुसरा पिंजरा लावला आहे. बिबट्या जेथून गेला, तेथे तिसरा पिंजरा लावण्यात येणार आहे.
विक्रांत बोरुडे, वनरक्षक, संगमनेर.
ग्रामीण भागात ऊस, मका व गिनीं गवत मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे बिबट्याचे जग्रामीण भागाकडे आक्रमण वाढले आहे. संगमनेर तालुक्यासह अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने हे रोखण्यासाठी ठोस उपायोजना कराव्यात.
दुर्गाताई तांबे, माजी नगराध्यक्षा, संगमनेर.
