संगमनेर । झुंजार न्यूज
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यात दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी 15 जुलैपासून दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यातील गावांमध्ये प्रचार व प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रा. बाबा खरात यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या या अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली असून दंडकारण्य अभियानाचे हे अठरावे वर्ष आहे. संगमनेर तालुक्यात दंडकारन्यामुळे वृक्ष संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उघडी बोडकी डोंगर आता हिरवीगार दिसू लागली आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी तालुक्यातील प्रत्येक गावात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व स्थानिक नागरिकांच्या सहभागाने दंडकारण्य अभियान अंतर्गत वृक्षारोपण केले जात असते. याहीवर्षी 15 जुलैपासून दंडकारण्य अभियानाची स्थापना, अभियान हेतू, पार्श्वभूमी याबाबत गावोगावी कलापथकाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे,

वाढलेले तापमान कमी झालेल्या पाऊस या ग्लोबल वार्मिंग च्या समस्या कमी करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरनाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट , क-हे घाट, कोची घाट या घाटांमध्ये वृक्षारोपणासह दरवर्षी रस्त्यांच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांचे रोपण करण्यात येते त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर अत्यंत सुंदर दिसतो. प्रत्येकाने दरवर्षी किमान दोन झाडे लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. यांसह विविध सामाजिक जाणीव व जबाबदाऱ्यांची माहिती विद्यार्थी व नागरिकांना लोकगीते, व्याख्यान यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

तरी आपण सर्वांनी हरितसृष्टीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी व पुढील पिढ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी तालुक्यातील गावातील सर्वांनी या लोक चळवळीत सहभागी व्हावे. व मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 657
